Tamannaah Bhatia on Intimate Scenes Shooting: तमन्ना भाटियाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यानंतर बॉलीवूड चित्रपट व वेब सीरिजमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. जवळपास दोन दशकांपासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या तमन्नाने मोठ्या पडद्यावर बोल्ड भूमिकाही केल्या आहेत.
‘बाहुबली’, ‘लस्ट स्टोरीज २’ व ‘ओडेला २’ या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकांनी लक्ष वेधून घेतले. तिने लस्ट स्टोरीज २ मध्ये इंटिमेट सीन केले होते. या दृश्यांचे शूटिंग कसे केले जाते, ते तमन्नाने सांगितलं.
तमन्ना भाटियाने नुकतीच द लल्लनटॉपला मुलाखत दिली. मुलाखतीत तमन्नाने इंटिमेट सीन सेटवर कशा पद्धतीने शूट केले जातात, ते सांगितलं. तसेच सेटवर एक इंटिमसी कोऑर्डिनेटर असतो. तसेच एक कॅमेरामन, दिग्दर्शक, टीममधील इतर सदस्य असे बरेच जण हा सीन शूट करताना असतात, असं तमन्नाने सांगितलं.
सेटवर असतो को-ऑर्डिनेटर
तमन्ना भाटियाने इंटिमेट सीनच्या शूटिंगबद्दल सांगितलं. हे कॉफीचा कप उचलून कॉफी पिण्यासारखं असतं, कारण काय करायचं, कसं करायचं ते सगळं ठरलेलं असतं. सेटवर इंटिमसी को-ऑर्डिनेटर असतात, त्यांचं काम एखादी व्यक्ती हे सीन करण्यास कंफर्टेबल नसतील तर तिच्या मनातील शंका दूर करणे हे असतं. काही वेळा दोन्ही कलाकार को-ऑर्डिनेटरला त्यांची बाजू सांगतात आणि मग तो सीन त्या पद्धतीने कोरिओग्राफ केला जातो, असं तमन्ना म्हणाली.
इंटिमेट सीनसाठी अपराधीपणाची भावना…, काय म्हणाली तमन्ना भाटिया?
इंटिमेट सीन करताना विचित्र वाटत नाही, कारण त्यावर आधीच चर्चा झाली असते, त्यामुळे गोष्टी नॉर्मल होतात, असं तमन्ना सांगते. इंटिमेट सीन्स केल्यामुळे बऱ्याचदा कलाकारांवर टीका होते. या टीकेबद्दल तमन्ना म्हणाली, “जेव्हा लोक एखादी गोष्ट समजू शकत नाहीत तेव्हा ते कलाकारांना लाजिरवाणं आणि अपराधी वाटायला लावतात. लोकांनी त्यांची मानसिकता इतकी वाईट केली आहे की ते एका अतिशय पवित्र गोष्टीकडे घाणेरड्या नजरेने पाहतात. जर इंटिमेसी व या गोष्टी नसतील तर या जगात कोणीही अस्तित्वात नसेल. कलाकारांनी जणू काहीतरी चुकीचं केलंय, अशा प्रकारे त्यांना लाज वाटायला लावली जाते. लोक चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे व्हिजन का समजू शकत नाहीत? असा प्रश्न पडतो.”
तमन्ना भाटियाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची ‘ओडेला 2’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने एका साध्वीची भूमिका केली होती. सध्या तमन्ना तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.