Tanushree Dutta Allegation On Nana Patekar : तनुश्री दत्ताने मंगळवारी ( २२ जुलै ) रात्री सोशल मीडियावर ओक्साबोक्शी रडतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. मला मदतीची गरज आहे, मला गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रचंड त्रास होतोय, असं तनुश्री या व्हिडीओमध्ये सांगत होती. मात्र, तिला नेमकं काय झालंय, कोणता त्रास होतोय याबद्दल अभिनेत्रीने काहीच वक्तव्य केलं नव्हतं.

आता तनुश्रीने ‘एबीपी माझा’शी फोनवर संपर्क साधून या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांवर तनुश्रीने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

तनुश्री दत्ता म्हणाली, “गेल्या चार ते पाच वर्षांपासून मी प्रचंड मानसिक त्रासात आहे. त्यामुळे मी कंटाळून तो रडतानाचा व्हिडीओ शेअर केला होता…मला भयंकर त्रास होतोय. मला कोणाचाही आधार नाहीये… मी प्रचंड अडचणीत आहे. काही गुंड माझा पाठलाग करत होते. २०२० पासून मला कोणतंही काम दिलं गेलं नाही. माझ्या हातात जे काही प्रोजेक्ट्स होते त्यातून मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ई-मेल, फोन सगळं काही हॅक करण्यात आलंय. माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात विष पेरलं गेलं, मी एकटी कशी पडेन, मला कोणीही मदत करणार नाही याकडे त्यांचं लक्ष असतं. माझ्या घरात एक अशी मदतनीस कामासाठी पाठवण्यात आली होती…जी माझ्या जेवणात काहीतरी भेसळ करायची; ज्यामुळे मी नेहमी आजारी पडायचे. हे सगळं सोडून दूर जायचं म्हणून मी उज्जैनला गेले होते पण, तिथे माझा अपघात झाला. माझ्या रिक्षाचे ब्रेक फेल करण्यात आले होते, तेव्हाच मी समजून गेले माझा मुद्दाम पाठलाग केला जातोय.”

या सगळ्याला नेमकं कोण जबाबदार? या प्रश्नावर उत्तर देताना तनुश्री म्हणाली, “मला यामागे नेमकं कोण आहे माहिती नाही पण, २०१८ नंतर या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात झाली होती. त्याआधी मी अशा घटना कधीच अनुभवल्या नव्हत्या. या सगळ्यामागे नाना पाटेकर हा एकटा नाहीये, बॉलीवूडची संपूर्ण माफिया गँग आहे, जी ही सगळी चुकीची कामं करतेय. त्यांना माझ्यापासून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ज्या गोष्टी सुशांत सिंह राजपूतबरोबर घडल्या होत्या…आज तेच सगळं माझ्याबरोबर घडतंय..फक्त फरक एवढाच आहे तो या जगात नाही आणि मी अजूनही जिवंत आहे. आज सुशांतची केस मी पूर्णपणे स्टडी केलीये म्हणूनच मी जिवंत आहे. अजूनही एक मुलगी आहे पूजा मिश्रा…तिलाही सगळ्यांनी वेडं ठरवलंय.”

“मी याच्याविरोधात ‘मी टू’ची केस फाइल केली होती. या सगळ्या लोकांचा अहंकार खूप मोठा आहे. ज्यावेळी त्यांच्याविरोधात बोलण्यासाठी कुणी पुढे येतं तेव्हा या गोष्टी त्यांना सहन होत नाही. मी तक्रार दाखल केली होती. पण, मराठी माणूस क्रिमिनल असला तरीसुद्धा पोलिसांचा पाठिंबा त्यालाच मिळतो. मंत्रीसुद्धा त्यालाच सपोर्ट करतात. त्यामुळे त्याची हिंमत वाढली, त्याचा अहंकार वाढला… त्याच्या मनात आलं असेल, आता हिला मी चांगलीच अद्दल घडवतो.” असे आरोप तनुश्रीने केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नाना पाटेकर अजिबात मोठा अभिनेता नाही…” – तनुश्री दत्ता

“तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या… नाना पाटेकर अजिबात मोठा अभिनेता नाही… मी त्याच्याबरोबर काम केलेलं तेव्हा त्याच्याकडे एकही चित्रपट नव्हता. निर्माते, दिग्दर्शक माझ्याकडे भिक मागत आले होते की, तुम्ही हा सिनेमा केला तरच हा चित्रपट चालेल. जर तो एवढा मोठा अभिनेता असता तर निर्मात्यांना आयटम साँगसाठी मला घ्यावं लागलं नसतं. नाना पाटेकर फक्त कागदावर मोठा अभिनेता आहे. पण, प्रत्यक्षात मात्र २००८ मध्ये त्याच्याकडे चित्रपट नव्हते. मी तेव्हा खूप मोठी अभिनेत्री होते…मला तेव्हा सगळेजण ओळखत होते. मी २००८ मध्ये खूप लोकप्रिय होते. त्याचे सिनेमे तर ७० च्या दशकात आले होते…त्याने माझ्या स्टारडमचा वापर करून स्वत:चं करिअर पुन्हा एकदा घडवण्याचा प्रयत्न केला होता. नाना पाटेकरबरोबर तेव्हा कोणी काम करायला तयार नव्हतं. कारण, त्याचा स्वभाव फारच वाईट आहे. त्याने युट्यूबवर स्वत:च एका मुलाखतीत मी अभिनेता नसतो तर, अंडरवर्ल्डचा डॉन असतो असं सांगितलं… मन्या सुर्वे त्याचा भाऊ आहे…त्याचा गँगस्टरशी संबंध आहे असं तो स्वत: बोललाय. आणि आज मलाही असेच काही गुंड त्रास देत आहेत. आता माझा कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये” असंही तनुश्रीने म्हटलं आहे.