The Bengal Files Movie Trailer : अनेक दिवसांपासून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. घोषणा झाल्यापासूनच अनेकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच ‘द बंगाल फाइल्स’चा ट्रेलर समोर आला आहे. शनिवारी (१६ ऑगस्ट) कोलकात्याच्या एक भव्य कार्यक्रमात तो प्रदर्शित करण्यात आला.

विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट पश्चिम बंगालच्या रक्तरंजित राजकीय इतिहासावर आधारित आहे. बंगालमध्ये हिंदूंवर झालेले अत्याचार, हिंसाचार व सांप्रदायिक राजकारण याबद्दलची सत्य परिस्थिती ‘द बंगाल फाइल्स’मधून समोर येणार आहे, याचीच छोटीशी झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलरमध्ये काय आहे?

३ मिनिटे ३२ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये १९४६ च्या बंगाल दंगली आणि नोआखाली हत्याकांडाची झलक दाखवण्यात आली आहे. याचवेळी बॅकग्राउंडमध्ये एक संवाद ऐकू येतो: “हे भारत नाही, हे पश्चिम बंगाल आहे. इथे दोन संविधानं चालतात – एक हिंदूंसाठी आणि एक मुसलमानांसाठी.”

या ट्रेलरमध्ये जिन्ना आणि गांधी यांच्यातील मतभेद, देशाच्या फाळणीदरम्यान झालेला संघर्ष, आंदोलने आणि रस्त्यांवर दिसणारा हिंसाचार दाखवण्यात आला आहे. त्यानंतर ट्रेलरमधील एका स्त्रीचा संवाद लक्ष वेधतो, तो म्हणजे “बंगाल ही फक्त जमीन नाही, तो भारताचा लाइटहाऊस आहे.”

ट्रेलरचा शेवट एका प्रश्नाने होतो: तो प्रश्न म्हणजे “स्वातंत्र्य मिळून ८० वर्षं झालीत, पण आपण अजूनही त्याच धार्मिक राजकारणाशी झुंजतोय… आपण खरंच स्वतंत्र आहोत का?” या चित्रपटाची कथा १९४६ च्या कोलकाता दंगली आणि त्यानंतर झालेल्या नोआखाली हत्याकांडावर केंद्रित आहे. 

दरम्यान, ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि सिम्रत कौर यांसारखे काही दिग्गज कलाकार आहेत.