‘द केरळ स्टोरी’चा वाद सुरू असतानाच कर्नाटकच्या निवडणुकांदरम्यान निर्माते संदीप सिंह यांनी टिपू सुलतानच्या आयुष्यावर बेतलेल्या आगामी ‘टिपू’ या चित्रपटाची घोषणा केली होती. इतकंच नव्हे तर दोन महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चांगलेच वातावरण तापले होते. टिपू सुलतानबद्दल आजवर आपल्याला जे सांगण्यात आले आहे, त्याच्या बरोबर उलट चित्र आपल्याला यात बघायला मिळणार होते.
इतकंच नव्हे तर हे मोशन पोस्टर प्रदर्शित करताना टिपू सुलतानची एक गडद आणि हिंस्त्र बाजू दाखवली जाणार असल्याचे अनेक दावे यात निर्मात्यांनी केली होते. या मोशन पोस्टरमुळे चांगलंच वातावरण तापलं होतं. आता या चित्रपटाबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे. हा चित्रपट आता डब्बाबंद होणार अशी घोषणा निर्माते संदीप सिंह यांनी केली आहे.
आणखी वाचा : डोक्यावर पगडी, हातात सिगारेट… ‘डंकी’मधील शाहरुख खानचे फोटो खरंच लीक झालेत का?
आपल्या ट्विटर हॅंडलवर संदीप यांनी लिहिलं, “हजरत टिपू सुलतान यांच्यावर कोणताही चित्रपट येणार नाही. मला, माझ्या कुटुंबाला, मित्र परिवाराला कोणीही आता धमक्या देऊ नये अशी मी विनंती करतो. नकळतपणे मी जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा तसा उद्देश अजिबात नव्हता. आपण भारतीय म्हणून एकत्र येऊन एकमेकांचा आदर करायला हवा.”
संदीप यांनी जेव्हा मोशन पोस्टर प्रदर्शित केलं होतं त्यावेळी ते म्हणाले होते की टिपू सुलतानला शूरवीर मानणं हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज होता. चित्रपटाचे दिग्दर्शन पवन शर्मा म्हणाले होते “आपल्याला आजवर पाठ्यपुस्तकातून टिपू सुलतानबद्दल सगळी चुकीची माहिती देण्यात आली आहे. जेव्हा टिपूबद्दल काही भयानक गोष्टी माझ्यासमोर आल्या तेव्हा मला खूप मोठा धक्काच बसला. या चित्रपटाच्या माध्यमातून ते भयावह सत्य उघडकीस आणणार आहे, जे इतक्या दिवसांपासून आपल्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. टिपू हा त्याच्या वडिलांपेक्षा क्रूर होता. तो त्या काळातील हिटलरच होता.”
संदीप सिंह यांनी २०१९ मध्ये आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिकची निर्मिती केली होती. तसेच बाळसाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील बायोपिकमध्येही त्यांचा मोठा सहभाग आहे.