ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी चार लग्नं केली. त्यांना पहिली पत्नी प्रतिमापासून पूजा व सिद्धार्थ ही दोन अपत्ये होती. त्यांचा मुलगा सिद्धार्थ बेदीने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आत्महत्या केली होती. या घटनेचा कबीर बेदींवर मोठा परिणाम झाला होता. मुलाच्या आत्महत्येच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं.
कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रतिमा यांचा मुलगा सिद्धार्थ बेदीने १९९७ मध्ये आत्महत्या केली. तो बराच काळ स्किझोफ्रेनियाने (मानसिक आजार) ग्रस्त होता. मुलाच्या मृत्यूनंतर कबीर बेदी हादरले होते. त्यांच्यासाठी जणू सगळंच संपलं होतं.
कबीर बेदी म्हणाले, “स्किझोफ्रेनिया होण्याचं कारण काय, त्यावर उपाय काय हे तेव्हा मेडिकलमध्येही फार कुणाला माहीत नव्हतं. तुलनेने आता उपचाराच्या पद्धती सुधारल्या आहेत व औषधंही उपलब्ध आहेत.”
सिद्धार्थच्या बालपणाबद्दल कबीर बेदी म्हणाले, “सिद्धार्थचं बालपण खूप सामान्य होतं. तो खूप हुशार होता. आम्ही त्याला कानागिरी युनिव्हर्सिटीत पाठवलं होतं. तिथून त्याने त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तेव्हाच त्याला स्किझोफ्रेनिया असल्याचं निदान झालं. पण नंतर त्याचा आजार आमच्यासाठी एक मोठा आघात ठरला.”
तो बरा होईल अशी आशा होती- कबीर बेदी
“मी माझ्या पुस्तकात याबद्दल सविस्तर लिहिलंय की कसं एक बाबा आपल्या मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करतोय. पण मुलगा म्हणतो, ‘मला असे आयुष्य जगायचे नाही. मला माझं आयुष्य या पद्धतीने जगायचंय हे मला मान्यच नाही. मला कशाची काहीच कल्पना नाही. मला चित्रपटांबद्दल काहीच माहीत नाही, मला पुस्तकांबद्दल माहीत नाही.’ या प्रश्नांची उत्तरं आई-वडिलांनी काय द्यावी. कॅलिफोर्नियात त्याच्यावर उपचार सुरू होते, त्यामुळे तो बरा होईल अशी आम्हाला आशा होती,” असं कबीर बेदी म्हणाले.
“अशा रुग्णांना जी औषधं दिली जातात, त्यामुळे रुग्णाला वाटतं की त्याला कोणीतरी ड्रग्ज दिले आहेत. ज्या दिवशी ती औषधं दिली जात नाही त्यावेळी त्याला वाटतं की मी नॉर्मल आहे. पण त्याचं नॉर्मल असणं वेगळं आहे. कदाचित तो इतरांसाठी नॉर्मल नसेल. त्यामुळे त्याला औषधं देण्यासाठी इतरांना खूप प्रयत्न करावे लागायचे. त्याच्या नजरेत औषधं देणारी व्यक्ती खलनायक असायची,” असं कबीर बेदी यांनी नमूद केलं.
“तुम्हाला आयुष्यात कितीही दुःख असेल, पण ते तुमचं मूल गमावण्यापेक्षा जास्त मोठं असूच शकत नाही. असं वाटतं कुणीतरी तुमच्या शरीरातील एक अवयव काढून घेतलाय,” असं कबीर बेदी मुलगा सिद्धार्थला गमावण्याबद्दल सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.