फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता विकी कौशल आणि चित्रपटाची निर्माती मेघना गुलजार इंडियन एक्सप्रेसचा खास कार्यक्रम ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये हजेरी लावली. सॅम बहादुर नावाने ओळखल्या जाणाऱ्या सॅम माणेकशा यांचा भारतीय लष्करातील प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान विकी आणि मेघना या दोघांनी प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या तसेच इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे एक्झिक्युटिव डायरेक्टर अनंत गोएंका यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना अगदी चोख उत्तरं दिली. याच मुलाखतीदरम्यान विकीने त्याच्या आजवरच्या सर्वात खराब कामाबद्दल आणि चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. अनुराग कश्यपचा ‘रमण राघव २.०’ हा विकीचा सर्वात खराब परफॉर्मन्स आहे असं खुद्द विकीनेच या मुलाखतीदरम्यान कबूल केलं.
विकी म्हणाला, “तो चित्रपट फारच गंभीर आणि गडद असा होता. मी त्यात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असल्याने माझी आई फार खुश होती, परंतु तिला कल्पना नव्हती की हा पोलिस अधिकारी कसा आहे ते. अगदी खरं सांगायचं झालं तर मला अजूनही वाटतं की तो माझा आजवरचा सर्वात खराब परफॉर्मन्स आहे. कारण ती भूमिका साकारताना मी फार लहान होतो अन् त्यामानाने जग नेमकं कसं असतं याची जाण मला फारशी नव्हती. आजही मी जर पुन्हा संधी मिळाली तर ती भूमिका मी अधिक वेगळ्या आणि उत्तम पद्धतीने साकारू शकेन.”
‘मसान’सारख्या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या विकीने वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं आहे. ‘रमन राघव २.०’मुळे विकिला खरी ओळख मिळाली. ‘राजी’नंतर दुसऱ्यांदा विकी कौशल मेघना गुलजारसह काम करत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. याच दिवशी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगलीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ‘सॅम बहादुर’मध्ये विकी कौशलसह सान्या मल्होत्रा, फातीमा सना शेख, नीरज काबि, गोविंद नामदेव, मुहम्मद झीशान अयुब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.