Vivek Agnihotri Statement On Marathi Food : ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द ताश्कंद फाइल्स’सारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे दिग्दर्शक म्हणजे विवेक अग्निहोत्री. सामाजिक आणि संवेदनशील सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे विवेक अग्निहोत्री अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत येत असतात. अशातच त्यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे.

विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या पत्नी, मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी अलीकडेच Curly Tales ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल संवाद साधला. या संवादादरम्यान जेव्हा विवेक यांना विचारण्यात आलं की, ‘पल्लवी जोशींनी त्यांना कोणते मराठी खाद्यपदार्थ खायला सांगितले, जे त्यांना आवडले?’ तेव्हा पल्लवी यांनी एक गमतीशीर किस्सा सांगितला.

पल्लवी जोशी यांनी सांगितलं की, “मी काहीही बनवलं की, यांना (विवेक अग्निहोत्री) काहीच आवडत नसे. यांना नेहमी वाटायचं, ‘हे काय गरिबांचं जेवण आहे. मराठी जेवण अतिशय साधं असतं. भाजी फक्त परतून खातात, त्यामुळे हे वारंवार म्हणायचे की, ‘हे गरिबांचं जेवण आहे.’ पण, आता ते सगळं खात आहेत, कारण त्यांना कळून चुकलंय की हे जेवण किती पौष्टिक आणि चांगलं आहे.”

यापुढे विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मी दिल्लीहून आलो होतो. तिथे बटर चिकन, कबाब, तंदुरी असं झणझणीत आणि मसालेदार जेवण खाल्लं होतं. लग्नानंतर पल्लवी म्हणाली, ‘वरण-भात खा.’ मी म्हटलं, ‘चालेल, खाऊया. पण, वरणामध्ये मीठसुद्धा नसतं; वरून घालावं लागतं. लिंबूही वरूनच पिळावा लागतो’. मग ती म्हणाली ‘कढी खा’ – मला वाटलं, त्यात वरून तूप आणि लाल मिरची असेल… पण नाही… मराठी लोकांची कढी म्हणजे अगदी आरोग्यदायी असते.”

आता विवेक अग्निहोत्री यांचं मत पूर्णपणे बदललं आहे. ते म्हणाले, “माझी एक वेगळी खाद्य संस्कृती आहे, त्यामुळे हा माझ्यासाठी सांस्कृतिक धक्का होता. सुरुवातीला वाटायचं की, हे जेवण शेतकऱ्यांसारखं आहे, गरिबांचं आहे; पण माझ्या मते हेच आरोग्यासाठी हेच सर्वोत्तम आहे. मराठी जेवण म्हणजे अगदी आरोग्यदायी आणि चवदार आहे.”

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांचा ‘बंगाल फाईल्स’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. बंगालमध्ये हिंदूंवर झालेले अत्याचार, हिंसाचार व सांप्रदायिक राजकारण याबद्दलची सत्य परिस्थिती ‘द बंगाल फाईल्स’मधून समोर येणार आहे. याचीच छोटीशी झलक काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळाली.

‘द बंगाल फाईल्स’ हा चित्रपट येत्या ५ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि सिम्रत कौर यांसारखे काही अनेक कलाकार आहेत.