Actor with a net worth of 1200 crore: सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे, बॉलीवूडचे लोकप्रिय चेहरे म्हणून ओळखले जाणारे, कोट्यवधीची संपत्ती असणारे असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीच्या सुरुवातीला खूप मेहनत केली, कष्ट केले. त्यानंतर त्यांना हळूहळू ओळख मिळाली.

या कलाकारांमध्ये एका अशा अभिनेत्याचा समावेश होतो, जो कधीकाळी कलाकारांच्या सरावाच्या खोल्या साफ करत असे. सेटवरील लोकांना चहा नेऊन देत असे; तर एके काळी तो लोकप्रिय दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानचा असिस्टंटदेखील होता आणि आता तो १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता विवेक ओबेरॉय आहे.

विवेक ओबेरॉय हा जेष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे. विवेकने नुकतीच माशाबल इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत विवेकने त्याच्या कारकि‍र्दीची सुरुवातीची वर्षे कशी होती, यावर वक्तव्य केले. तो म्हणाला, “मी फराह खानचा असिस्टंट म्हणून बरीच वर्षे कामे करत होतो. जिथे कलाकार, डान्सर सराव करायचे त्या खोल्या साफ करणे, सर्वांना चहा नेऊन देणे अशी मी सुरुवात केली होती. मी कधीच कोणाला हे सांगितले नाही की माझे वडील कोण आहेत.

२००२ मध्ये अभिनेत्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘साथिया, ‘मस्ती’ आणि ‘ओमकारा’सारख्या हिट चित्रपटांमुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. बॉलीवूडमधील सर्वात तरुण स्टारपैकी एक म्हणून तो ओळखला जाऊ लागला. मात्र, दरम्यानच्या काळात सलमान खानबरोबर झालेल्या वादामुळे त्याच्या करिअरवर परिणाम झाला.

“मला इंडस्ट्रीतून काढून…”

२००३ मध्ये अभिनेत्याने सलमान खानकडून छळ होत असल्याचा आरोप करत पत्रकार परिषद बोलावली. यानंतर त्याच्या कारकिर्दीवर परिणाम झाला. प्रखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणालेला की मला इंडस्ट्रीतून काढून टाकण्यात आले होते. त्या काळात एक क्षण असा आला की आजूबाजूचे सर्वजण माझ्यावर बहिष्कार घालत होते. कोणीही माझ्याबरोबर काम करण्यास तयार नव्हते आणि मी आधीच साइन केलेल्या चित्रपटांमधूनही मला काढून टाकण्यात आले. इतकेच नाही तर मला धमक्या देणारे बरेच फोन येत होते. हे फोन माझ्या बहिणीला, वडिलांना आणि आईलाही येत होते.”

मात्र, अभिनेत्याने हार मानली नाही. त्याने रक्त चरित्र आणि लूसिफरसारख्या मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. इनसाइड एजसारख्या वेब सीरिजमध्येदेखील काम केले. २०१३ मध्ये अभिनेत्याने ग्रँड मस्ती आणि क्रिश ३ सारख्या चित्रपटांत काम केले. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले.

विवेकच्या संपत्तीचा स्त्रोत फक्त अभिनय नाही, तर त्याची रिअल इस्टेट कंपनी कर्मा इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मेगा एंटरटेनमेंट हे त्याचे प्रामुख्याने संपत्ती मिळवण्याचे साधन आहे. तो स्वर्णिम युनिव्हर्सिटीचा सह-संस्थापक आणि अनेक स्टार्ट-अॅप्समध्ये गुंतवणूकदार आहे. फोर्ब्सच्या ४० अंडर ४० हिरोज ऑफ फिलान्थ्रॉपी यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय अभिनेता आहे.

द स्टेटमन आणि इतर रिपोर्ट्सनुसार त्याची संपत्ती १२०० कोटी आहे, त्यामुळे तो भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची संपत्ती रणबीर कपूर, अल्लू अर्जुन, प्रभास आणि रजनीकांतसारख्या सुपरस्टारपेक्षाही जास्त आहे.

विवेक ओबेरॉय लवकरच ‘मस्ती ४’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.