८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूड चित्रपटांना उभारी देणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली होती, एकूणच हिंदी चित्रपटात तोचतोचपणा यायला लागला होता. अनिल कपूर सनी देओल, मिथुन चक्रवर्तीसारखे कलाकार जोमात होतेच, पण त्या काळात खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं मनोरंजन गोविंदाने केलं होतं. एकाहून एक सरस असे चित्रपट देणारा गोविंदा त्यावेळी तीन शिफ्टमध्ये काम करणारा सर्वात बिझी अभिनेता होता.

त्यावेळी गोविंदा हा चित्रपटसृष्टीत सर्वात उशिरा येणारा अभिनेता म्हणून कुप्रसिद्ध होता. सकाळच्या शिफ्टला गोविंदा दुपारी हजर व्हायचा, बऱ्याच लोकांनी याबद्दल सांगितलं आहे. नुकतंच स्टंट डायरेक्टर आणि निर्माते रवी देवन यांनीच गोविंदाचा एक किस्सा शेअर केला आहे. १९९१ मध्ये ‘हम’ चित्रपटासाठी काम करताना गोविंदाने चक्क अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनाही ताटकळत ठेवल्याची आठवण त्यांनी सांगितली आहे.

आणखी वाचा : अभिनेत्रीने ७५ वर्षाच्या वृद्धाकडून लुबाडले ११ लाख; नग्नावस्थेतील फोटो दाखवून केलं ब्लॅकमेल

‘बॉलिवूड ठिकाना’शी संवाद साधताना रवी म्हणाले, “तीनही अभिनेते जेव्हा एकत्र असायचे तेव्हाच आम्ही चित्रीकरण करायचो. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दोघेही असे अभिनेते होते जे त्यांच्या सीनच्या बरोबर अर्धा तास आधी सेटवर यायचे, पण गोविंदा मात्र दुपारच्या जेवणानंतर सेटवर यायचा. स्वतःच्या प्रोडक्शनच्या चित्रपटाच्या सेटवरही गोविंदा उशिराच यायचा. वेळेचं नियोजन कधी त्याला जमलंच नाही.”

‘हम’च्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले, “एकेदिवशी चित्रपटात भल्या पहाटे तीनही अभिनेत्यांचा एकत्र एक सीन ठरवण्यात आला होता. अमितजी आणि रजनीकांतजी वेळेत तयार होऊन सेटवर आले. त्या सीनसाठी गोविंदा वेळेत यावा यासाठी आम्ही तब्बल ४ ते ५ दिवस वाट पाहिली, पण तो एकदाही वेळेवर आलेला नाही. असं नेमकं का घडलं याचं उत्तर अजूनही कोणाला मिळालेलं नाही. शेवटी आम्ही तो सीन चित्रपटातून काढून टाकला.”

आणखी वाचा : पत्नी रुग्णालयात असताना चाहत्याच्या ‘या’ वाक्यामुळे संतापलेले सतीश शाह; अभिनेत्यानेच केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९१ मध्ये आलेला ‘हम’ दिग्दर्शक मुकुल एस आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि गोविंदा या त्रिकुटाव्यतिरिक्त, चित्रपटात दीपा साही, शिल्पा शिरोडकर, डॅनी डेन्झोंगपा, कादर खान आणि अनुपम खेरसारखे कलाकारदेखील होते. कादर खान यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले होते. शिवाय यातील ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवरही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला.