कंगना रणौत सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करीत असते. ती कधी वादग्रस्त विधाने तर कधी पोस्टच्या माध्यमातून कोणाचे तरी कौतुक करीत असते. बऱ्याचदा कंगना देशातील महत्त्वाच्या समस्यांबद्दल भाष्य करते, याबरोबरच ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची मते बिनधास्त आणि परखडपणे मांडत असते. कंगनाच्या याच गुणांमध्ये अनेकदा तिला अडचणींचा सामना करावा लागला आहे.

मध्यंतरी हृतिक रोशनबरोबरच्या अफेअरमुळे या दोघांची चांगलीच चर्चा झाली होती. खुद्द हृतिकनेही याबद्दल एक खास मुलाखत देऊन त्यांच्यामधील नात्याचा खुलासा केला होता. तेव्हा हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. आता नुकतंच कॉमेडीयन वीर दासबरोबरचा एक प्रसंग सांगताना पुन्हा हृतिकचं नाव कंगनाच्या तोंडी आलं आहे.

आणखी वाचा : बहुचर्चित ‘टिपू’ चित्रपट झाला डब्बाबंद, निर्मात्यांची मोठी घोषणा; पोस्टरमुळे निर्माण झालेला मोठा वाद

एका मीडिया रिपोर्टनुसार २०१४ मधील ‘रीवॉल्वर रानी’ या चित्रपटाच्या एका किसिंग सीनदरम्यान अभिनेता कॉमेडीयन वीर दासला कीस करताना कंगना भान हरपून बसल्याचं समोर आलं. या सीनदरम्यान कंगना इतकी वाहवत गेली की तिने वीर दासच्या ओठातून रक्त येईपर्यंत त्याला कीस केल्याचं या मीडिया रीपोर्टमध्ये सांगण्यात आलं.

हाच मीडिया रीपोर्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर करत कंगनाने याचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “बापरे हृतिक रोशननंतर मी वीर दासच्या आब्रूवर हात टाकला, हे कधी झालं?” कंगनाच्या या खोचक वक्तव्याचं काहींनी कौतुक केलं तर काही लोकांनी या सगळ्यात हृतिकला खेचायची काय गरज होती असाही सवाल केला. हृतिकचं लग्न झालेलं असतानाही तो कंगनाबरोबर डेट करत असल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला होता, हृतिकने मात्र हे सगळं खोटं असल्याचं सांगितलं होतं.