When Pregnant Asha Bhosle Was Asked to Leave Home: भारतातील लोकप्रिय गायिका म्हणून आशा भोसलेंची ओळख आहे. ८ सप्टेंबरला त्यांनी ९२ वा वाढदिवस साजरा केला.
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितसह देशभरातील अनेक नामांकित व्यक्तींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशातच आशा भोसले यांच्या एका जुन्या मुलाखतीतील वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
आशा भोसले यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबत वक्तव्य केले होते. कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्याने त्यांचे कुटुंब त्यांच्याशी खूप काळापर्यंत बोलत नव्हते.
“मी खूप लहान वयात…”
कविता छिबर यांना दिलेल्या मुलाखतीत आशा भोसले म्हणालेल्या, “मी खूप लहान वयात लग्न केले. ज्याच्याशी लग्न केले तो माझ्यापेक्षा २० वर्षांनी मोठा होता. आमचा प्रेमविवाह होता. मी त्यावेळी १६ वर्षांची होते आणि गणपतराव भोसले तेव्हा ३१ वर्षांचे होते. माझ्या कुटुंबाला हा विवाह मान्य नव्हता. लता दीदी माझ्याशी खूप काळापर्यंत बोलल्या नाहीत. त्यांना माझा हा निर्णय पटलेला नव्हता.”
“मी ज्या घरात लग्न करून गेले, त्यांचे कुटुंब खूप रूढीवादी विचारांचे होते, त्यामुळे संगीत क्षेत्रातील नावाजलेली गायिका सून म्हणून ते मला स्वीकारू शकले नाहीत. दुसरीकडे माझ्या पतीला मी माहेरच्या लोकांशी संबंध ठेवावे असे वाटत नव्हते. विशेषत: लता दीदींशी जवळीकता असू नये, असे त्यांना वाटायचे.”
जेव्हा आशा भोसलेंच्या दुसऱ्या मुलाचा हेमंतचा जन्म झाला, परिस्थिती थोडी चांगली होऊ लागली. पण, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. आशा भोसलेंना कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागले. खूप काळ त्यांनी हा छळ सहन केला. जेव्हा त्या तिसऱ्यांदा गरोदर राहिल्या, तेव्हा सासरच्यांनी त्यांना घर सोडण्यास सांगितले.
“माझ्याबरोबर जे घडले, त्यासाठी मी…”
आशा भोसले याबद्दल म्हणालेल्या, “सासरी माझा छळ झाला. मला वाईट वागणूक देण्यात आली. जेव्हा मी तिसऱ्यांदा गरोदर होते, त्यावेळी घरातून बाहेर काढले. त्यानंतर मी परत माझ्या आई, भावा-बहिणींकडे आले आणि त्यांच्याबरोबर राहू लागले. माझ्याबरोबर जे घडले, त्यासाठी मी कोणालाही दोष देत नाही किंवा माझ्या मनात कोणाबाबत वाईट हेतूदेखील नाही. मला असे वाटते की, गणपतराव भोसलेंना मी भेटले नसते तर मला इतकी छान तीन मुले झाली नसती.”
आशा भोसलेंनी १९८० मध्ये आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न केले. हे दोघांचेही दुसरे लग्न होते. मात्र, लग्नाच्या काही वर्षांनी ते वेगळे राहू लागले होते. बर्मन यांच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला होता असे म्हटले जाते. १९९४ साली आर. डी. बर्मन यांचे निधन झाले. तोपर्यंत ते एकमेकांवर प्रेम करत होते, त्यांच्या मनात परस्परांविषयी आदर होता.