भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत महत्त्वाचे आणि आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे पृथ्वीराज कपूर. आज पृथ्वीराज कपूर यांची ११७ वी जयंती. पृथ्वीराज यांनी अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांची मुलं, नातवंडे आणि पतवंडेही याच क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. कपूर कुटुंबामधील अभिनयाचा वारसा त्यांच्यापासूनच सुरु होतो. ‘मुघल-ए-आझम’ या १९६० साली आलेल्या चित्रपटातील अकबरच्या भूमिकेमधील पृथ्वीराज यांच्या कामाची आजची पिढीसुद्धा फॅन आहे.
पेशावर येथील थिएटरमधून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पृथ्वीराज यांचे सुपुत्र व चित्रपटसृष्टीचे शोमॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांनी आपल्या वडिलांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला. वयाच्या २४ व्या वर्षीच त्यांनी आरके स्टुडिओची स्थापना केली व चित्रपटसृष्टीला एक वेगळं वळण दिलं. आपल्या वडिलांचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी राज कपूर कायम झटत राहिले. शशी कपूर व दीपा गहलोट यांनी एकत्रितपणे लिहिलेल्या ‘ द पृथ्वीवल्लाह’ या पुस्तकात त्यांचे बरेच किस्से आपल्याला वाचायला मिळतील.
आणखी वाचा : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’साठी असणार दोन मध्यांतर? चित्रपटाच्या ट्रेलरबद्दलही नवी माहिती समोर
‘बीबीसी हिंदी’ला शशी कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकप्रिय झाल्यानंतर राज कपूर यांना त्यांच्या वडिलांना एक छान भेटवस्तू द्यायची होती, इतकंच नव्हे तर त्यांनी वडिलांसाठी नवी कोरी गाडी घ्यायचंही ठरवलं होतं. त्याकाळी पृथ्वीराज कपूर हे त्यांनी १९३८ सालची जुनी ओपेल कारच वापरत होते. राज कपूर जेव्हा मोठे स्टार झाले तेव्हा मात्र त्यांना आपल्या वाडिलांकडे आलिशन गाडी असावी असं फार वाटत होतं.
यासाठी राज कपूर यांनी आपले वडील पृथ्वीराज कपूर यांना सही केलेला कोरा चेक देऊ केला असल्याचंही शशी कपूर यांनी सांगितलं. परंतु पृथ्वीराज कपूर यांनी कधीच तो चेक बँकेत जमा केला नाही. त्यांनी त्या चेकवरील संख्येच्या रकान्यात ‘भरपुर प्रेम’ असं लिहिलं आणि तो चेक त्यांनी जतन केला होता, इतकंच नव्हे तर पृथ्वीराज कपूर यांना या गोष्टीचा फार अभिमान होता, ते प्रत्येकाला तो चेक अभिमानाने दाखवायचे. ही आठवण शशी कपूर यांनी सांगितली, इतकंच नव्हे तर राज कपूर यांना पहिला ब्रेकसुद्धा पृथ्वीराज कपूर यांनीच दिला होता.