बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाने काही वेळापूर्वीच आपली प्रेयसी लिन लैशरामशी लग्न केलं आहे. पारंपरिक मणिपुरी पद्धतीने या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि हे दोघंही आता पती-पत्नी झाले आहेत. रणदीप हुड्डाने दोन दिवसांपूर्वी काही फोटो पोस्ट केले होते. ज्यानंतर तो आणि लिन लवकरच लग्न करणार आहेत हे स्पष्ट झालं होतं. मात्र लिन लैशराम कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? आपण जाणून घेऊ तिच्याविषयी.

लिन लैशराम कोण आहे?

लिन लैशराम ही मणिपूरची एक प्रसिद्ध मॉडेल आहे. तसंच ती एक अभिनेत्रीही आहे. लिनने बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या लिन Shampoo Sana नावाचा एक ज्वेलरी ब्रांड चालवते. लिन आणि रणदीप या दोघांमध्ये दहा वर्षांचं अंतर आहे.

लिनने कुठल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे?

लिन लैशरामने प्रियंका चोप्राच्या ‘मेरी कोम’, करीनाच्या ‘जाने जाँ’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ‘रंगून’, कैदी बंदी, ‘मटरु की बिजली का मन डोला’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसंच २०१२ मध्ये तिने एक रिअॅलिटी शोदेखील केला होता. कॅलेंडर गर्ल असं त्या शोचं नाव होतं. रणदीप आणि लिन या दोघांचे प्री वेडिंग फोटो व्हायरल झाले. या फोटोंमध्ये ते दोघंही आपल्या मित्र-मैत्रिणींसह धमाल मस्ती करताना दिसत आहेत.

हे पण वाचा- Video : ४७ वर्षीय रणदीप हुड्डा गर्लफ्रेंडबरोबर अडकला विवाहबंधनात! मणिपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने पार पडलं लग्न

लिन लैशराम मणिपूरची आहे

१९ डिसेंबर १९८५ च्या दिवशी जन्मलेली लिन लैशराम मणिपूरची आहे. लिनच्या कुटुंबात तिचे वडील चंद्रसेन लैशराम आणि आई सरोधिनी लैशराम आहे. तिचे वडील बँकर आहेत. तर लिनला रिता लैशराम ही बहीणही आहे. लिनचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं आहे. टाटा तिरंदाजी अकादमीमध्ये तिने तिरंदाजीचंही प्रशिक्षण घेतलं आहे. तसंच न्यूयॉर्कच्या स्टेला एडलर स्टुडिओत तिने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. लिनने शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या सिनेमात कॅमिओ केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिन लैशराम आणि रणदीप हु्ड्डा हे एकमेकांना दीर्घ काळापासून डेट करत आहेत. आधी त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता या दोघांनीही एकमेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आहे.