अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. ‘कालीचरण’, ‘विश्वनाथ’, ‘जानी दुश्मन’, ‘जमाना दिवाना’ आणि ‘दोस्ताना’ यासह अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शत्रुघ्न सिन्हा यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्य देखील कायम चर्चेत राहिले.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नीचं नाव पूनम सिन्हा आहे, पण त्यांचं अभिनेत्री रीना रॉयबरोबर अफेअर होतं. ‘एनिथिंग बट खामोश’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी रीना रॉयबरोबरचं अफेअर अन् पूनमशी लग्न यासंदर्भात एक वाक्य लिहिलं आहे. “कोणाशी लग्न करावं, ही माझ्यासाठी समस्या नव्हती, तर कोणाशी करू नये ही होती.”

शत्रुघ्न सिन्हानी ‘कालीचरण’, ‘मिलाप’, ‘संग्राम’, ‘सत श्री अकाल’, आणि ‘चोर हो तो ऐसा’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये रीनाबरोबर काम केलं. दोघांचे सात वर्षे अफेअर होते आणि ते सर्वांना माहीत होते. तरीही त्यांनी अचानक अभिनेत्री पूनम चंदिरामानीशी लग्न करण्याची घोषणा केली होती.

शत्रुघ्न यांनी रीनावर प्रेम असूनही पूनमशी लग्न का केलं?

शत्रुघ्न यांनी पूनमशी लग्न करत असल्याचं जाहीर केल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. काही वर्षांनंतर एका मुलाखतीत याबद्दल त्यांना थेट विचारण्यात आलं होतं. “तुमचं रीना रॉयबरोबर अफेअर होतं, मग लग्न पूनमशी का केलं? असं मुलाखतकाराने थेट विचारल्यावर शत्रुघ्न म्हणालेले, “आयुष्यात माणूस कधीतरी अशा टप्प्यावर असतो, जिथे निर्णय घेणं खूप कठीण असतं. अशावेळी जो निर्णय घेतला जातो, तो नेहमी सर्वांच्या हिताचा नसतो.”

लग्नाआधी घाबरले होते शत्रुघ्न सिन्हा

लग्न ठरल्यावरही निर्णय मागे घेण्याचा विचार डोक्यात येत होता, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी स्टारडस्ट मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत कबूल केलं होतं. “त्यावेळी मला खूप भीती वाटत होती, मी खूप घाबरलो होतो. कारण मी बॅचलर म्हणून आनंदी होतो. पण आयुष्यात मी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे मला निर्णय घेणं भाग होतं. शेवटच्या क्षणापर्यंत मला त्या निर्णयापासून मागे हटायचं होतं. लग्न मुंबईत होतं आणि मी लंडनला होतो. मी शेवटची फ्लाइट पकडली, ज्यामुळे मी माझ्याच लग्नात वेळेवर पोहोचू शकलो. पूनमला वाटलं मी मागे हटतोय, पण तरीही ती माझ्याशी खूप चांगली वागली. आमच्या लग्नात जर काही त्रुटी असतील तर त्यात फक्त माझा दोष असेल, तिचा नाही,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.

पूनम त्यांच्या लग्नाची तयारी करत असताना शत्रुघ्न रीना रॉयबरोबर स्टेज शोसाठी लंडनमध्ये होते. “होय, मी लग्नाच्या तयारीसाठी तिथे नव्हतो,” याची कबुली त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिली आहे. लग्नानंतरही शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयच्या संपर्कात होते, या गोष्टीचा पूनम सिन्हा यांना खूप त्रास झाला होता.

लग्नानंतरही एक्स गर्लफ्रेंडच्या संपर्कात होते शत्रूघ्न सिन्हा

“माझ्यासाठीही हा कठीण काळ होता, कारण मलाही हा भावनिक गुंता सोडण्यात वेळ लागत होता. प्रॉमी (पूनम) खूप रडायची, पण तिला माहीत होतं की मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. आम्हाला सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून वैवाहिक आयुष्याची सुरुवात करायला थोडा वेळ लागला. कारण तिथे मी केलेल्या कमिटमेंटचा प्रश्न होता. ‘तू लग्न करून संसार थाटलाय, मग मी वापरून फेकून द्यायला फक्त खेळणी आहे का?’ असा प्रश्न मी तिच्यासोबत (रीना) बाहेर असताना मला तिने विचारला होता,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.