Main Hoon Na Movie : ‘मै हूँ ना’ हा शाहरुख खानच्या प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. फराह खानने या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकला होता. ‘मै हूँ ना’मधील शाहरुख खान व सुश्मिता सेन यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. चित्रपटात शाहरुख खानने राम हे पात्र साकारलं होतं. त्याला लक्ष्मण नावाचा एक लहान भाऊसुद्धा असतो. परंतु, लक्ष्मणच्या भूमिकेसाठी फराह खानला बरीच मेहनत घ्यावी लागली. या भूमिकेसाठी हृतिक रोशन, अभिषेक बच्चन व सोहेल खान यांना विचारणा झाली होती. याबाबत ‘मै हूँ ना’मधील अभिनेता झायेद खानने नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
झायेद खानने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यामध्ये त्याने ‘मै हूँ ना’ चित्रपटासाठी त्याची निवड कशी झाली याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला, “‘मै हूँ ना’मधील लक्ष्मण या भूमिकेसाठी त्याच्याआधी हृतिक रोशन, अभिषेक बच्चन व सोहेल खान यांना विचारणा झाली होती. नंतर माझ्याकडे ही भूमिका आली.” पुढे तो म्हणाला, “मी माझ्या एका गाण्याच्या निमित्ताने फराह खानला फोन केला होता, कारण मला तिची मदत हवी होती. पण, मी फोन केल्यानंतर माझं बोलणं संपण्याआधीच तिने मला सांगितलं की तू माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेट. मी तिने बोलावलेल्या ठिकाणी गेल्यानंतर समजलं की हे तिचं ऑफिस नाहीये, कारण तेथील सगळ्या भिंतींवर फक्त शाहरुख खानचे फोटो लावलेले होते.”
झायेद याबद्दल सांगताना पुढे म्हणाला, “फराह जेव्हा तिथे आली तेव्हा मी तिला विचारलं की ती मला माझ्या गाण्यासाठी मदत करणार आहे की नाही. ती मला गप्प बस असं म्हणाली आणि शाहरुख खानला माझ्याशी बोलायचं आहे असं सांगितलं. त्यानंतर शाहरुख खान तिथे आला आणि मला म्हणाला, “तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, आम्ही तुला इथे बोलावलं आहे कारण आम्ही तुझा एका भूमिकेसाठी विचार करत आहोत. ते ऐकून मी भारावून गेलो होतो आणि तिथेच ऑडिशनची तयारी केली.” फराह खानच्या प्रतिक्रियेबद्दल झायेद म्हणाला, “यानंतर फराह खान काही न बोलताच निघून गेली आणि ती तिच्या गाडीतून घरी जायला निघाली असताना माझ्याकडे बघून म्हणाली, तू माझ्या चित्रपटात काम करत आहेस. तिचं हे बोलणं ऐकून मी इतका आनंदी झालो की ती तिथून गेल्यानंतर तिथे असलेल्या एका झाडाला मी चक्क मिठी मारली.”
झायेद ‘मै हूँ ना’मधील त्याच्या भूमिकेबद्दल म्हणाला, “या चित्रपटासाठी मी खूप आनंदी होतो. मला या लोकांसह काम करण्याची संधी मिळत आहे या विचारानेच मी भारावून गोलो होतो. पण, तेव्हा असे काही लोक होते जे मला तुला शाहरुख खान इतका स्क्रीन टाईम मिळणार नाही असं म्हणायचे. पण, शाहरुख खानने मला खूप मदत केली.” शाहरुख खानबद्दल झायेद पुढे म्हणाला, “चित्रपटातील एक सीन मला जमत नव्हता, तेव्हा शाहरुख खानने मला यासाठी तुला सराव करायचा आहे का असं विचारलं आणि तो मला एका रुममध्ये घेऊन गेला आणि माझ्याकडून सराव करून घेतला. त्यानंतर जेव्हा मी तो सीन केला तेव्हा सगळ्यांनी सीन कट झाल्यानंतर माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि माझं कौतुक केलं.”