२०१७ आणि २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉईज’ ‘बॉईज २’ ला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. त्यानंतर आता बॉईज ३ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. या चित्रपटातील धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांचे त्रिकूट आणि त्यांच्या आयुष्यात येणारी कानडी मुलगी यांची धमाल मस्ती आपल्याला पडद्यावर पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज ३’नेही अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. नुकतंच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
बॉईज ३ या चित्रपटात धैर्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाला किर्तीने दिलेली साथ प्रेक्षकांना विशेष आवडली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टी आणि समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘बॉईज ३’ चा डंका वाजताना दिसत आहे. शाळेपासून सुरु झालेला बॉईजचा हा प्रवास आता महाविद्यालयापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्यांची धमालही आता तिप्पट झालेली आहे.
आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा
केवळ तीन दिवसांतच ‘बॉईज ३’ ने एक नाही, दोन नाही तर तब्बल ३.०५ कोटींचा लक्षणीय गल्ला जमवला आहे. सर्व तिकीट खिडक्यांवर ‘हॉऊसफ़ुल्ल’ची पाटी पाहायला मिळत आहे. सध्या चित्रपटगृहात प्रत्येक डायलॉगवर टाळ्या आणि शिट्ट्या ऐकू येत आहेत. चित्रपटगृहाच्या बाहेर पडताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून एकंदर हा चित्रपट उत्तम असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे.
चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले, ” ‘बॉईज १’ आणि ‘बॉईज २’ नंतर प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करणे आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. मात्र यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली. ‘बॉईज ३’ला प्रेक्षकांचा मिळणारा हा सकारात्मक प्रतिसाद पाहता आमच्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळत आहे. प्रेक्षकांना मिळणाऱ्या या प्रेमामुळेच आम्ही ‘बॉईज ४’ची या चित्रपटात घोषणाही केली आहे. त्यामुळे आता ही धमाल चौपट होणार आहे.”
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.