‘शार्क टँक’च्या पहिल्या पर्वात सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारा परीक्षक म्हणजे अश्नीर ग्रोव्हर होय. या शोनंतर अश्नीरची खूप चर्चा झाली. त्याच्या बिझनेस डीलपेक्षा त्याचे वैयक्तिक आयुष्य, प्रेमकहाणी करिअरची सुरुवात व संघर्ष याबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. अश्नीरने अनेक मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं होतं.

अश्नीरच्या पत्नीचं नाव माधुरी आहे. दोघांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत दोघेही बाथरूममध्ये एकत्र आंघोळ करायचो, असं अश्नीरच्या पत्नीने म्हटलं होतं. अश्नीर ग्रोवर व माधुरी जैन यांनी आरजे अनमोल व अमृता राव यांना मुलाखत दिली होती. लग्नानंतर अश्नीर व माधुरी मुंबईत 1BHK फ्लॅटमध्ये राहत होते. या दाम्पत्याने त्या इमारतीला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. ज्या परिसरात ते राहायचे, तिथे आता अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. परिसर पूर्वीसारखा राहिलेला नाही. १८ वर्षांपूर्वी ते दोघेही कामासाठी दिल्लीहून मुंबईला आले होते, असं माधुरीने सांगितलं होतं.

मुंबईत नोकरी करायचे अश्नीर व माधुरी

“आमच्या घरी साधं टेबलही नव्हतं. आम्ही खाली बसून जेवायचो. आमच्या एका महिन्याच्या पगारातून आम्ही फर्निचर विकत घेतलं होतं. एकदा अश्नीरने लकी ड्रॉद्वारे १२ लाखांची बाइक जिंकली होती. मी त्याला विचारलं की, बक्षिसामध्ये अजून काय आहे, तर त्याने सांगितलं की, एलसीडी टीव्हीपण आहे. मग मी अश्नीरला टीव्ही आणायला सांगितलं. कारण मी त्याला बाइक चालवू द्यायची नाही. आम्ही मुंबईत ४८ हजार पगारावर जगत होतो,” असं माधुरी म्हणाली होती.

“आम्ही १६ हजार रुपये भाडं द्यायचो आणि बाकीच्या पगारात सिनेमा पाहायला जायचो. प्रीमियम सीट्स घेण्यासाठी आणि चांगल्या जेवणावर पैसे खर्च करायचो. इतकंच नाही तर, आम्ही अमेरिका आणि कॅनडालाही जायचो, कारण तेव्हा डॉलर ४० रुपयांवर होता. आमच्या घरात एकच बाथरूम होतं. कधीकधी आम्ही दोघे एकत्र आंघोळ करायचो. कारण एकच बाथरूम असल्याने ऑफिसला जायला उशीर व्हायचा,” असं माधुरी म्हणाली होती.

माधुरीने सांगितलं की, जेव्हा अश्नीर मुंबईत होता, तेव्हा तो खूप रोमँटिक होता. आम्ही फक्त अॅनिव्हर्सरी व वाढदिवशीच एकमेकांना गिफ्ट द्यायचो असं नाही, तर आम्ही नेहमी एकत्र शॉपिंग करायचो, एकमेकांना आवडणाऱ्या त्या गोष्टी घेऊन द्यायचो, असं माधुरीने म्हटलं होतं.