‘धूम ३’ चित्रपटातील अभिनेता अभिषेक बच्चनला वडिलांनी प्राप्त केलेल्या यशापर्यंत पोहोचणे अशक्य वाटते. बॉलिवूडमधील महानायक आमिताभ बच्चन यांचा मुलगा होणे सोपे नाही. वडिलांनी मिळवलेल्या यशापर्यंत पोहोचण्याचा विचार करणे देखील शक्य नाही. माझा मार्ग स्वत: बनवण्याला मी पसंती देत असल्याचे तो म्हणतो.
चार दशकांपेक्षा जास्त काळच्या कारकिर्दीत अमिताभनी १८० हून जास्त चित्रपटात काम केले. आजही ते चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात. ७१ व्या वर्षी देखील बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त कलाकार म्हणून त्यांची गणना होते. या क्षेत्राच्या मागणीनुसार बदलांचा स्वीकार करत, स्वत:ला यासाठी अनुकूल करण्याची खुबी त्यांच्यात आहे. वडिलांविषयी बोलताना अभिषेक म्हणतो, प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. आपण मंगळावर पोहोचण्याचे ध्येय ठेऊ शकतो… सूर्यापर्यंत पोहोचणे विसरलेलेच बरे. ते शक्य होणार नाही. माझ्या वडिलांच्या बाबतीतसुद्धा तसेच आहे. ते महान होते, आहेत आणि नेहमी राहतील. त्यांच्यासारखे होणे शक्य नाही. त्यामुळे स्वत:चे व्यक्तीमत्व विकसित करा आणि तुमचे लक्ष्य गाठा.
अभिषेकला बॉलिवूडमध्ये अद्याप सुपरस्टारपदापर्यंत मजल मारता आली नसली, तरी ‘युवा’, ‘बंटी और बबली’ आणि ‘गुरू’सारख्या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची वाखाणणी झाली आहे. चांगले काम करण्यावर त्याचा विश्वास असून, चित्रपटाचे कथानक चांगले नसल्यास, चित्रपट ‘हिट’ होईल याची खात्री देऊ शकत नसल्याचे तो आवर्जुन सांगतो. चित्रपट मुळातच चांगला नसेल, तर त्या चित्रपटात अमिताभ बच्चन काम करत असूनसुद्धा तो चित्रपट चालणार नाही. वाईट चित्रीकरण आणि चांगले कथानक नसल्यास, कोणीही तुमचा चित्रपट वाचवू शकत नाही. त्यामुळे, चित्रपटाची निवड योग्यप्रकारे करणे महत्वाचे असल्याचे तो म्हणतो.