वैभव मांगले
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला सतत कुठून ना कुठून माहिती मिळत असते. गरज असो नसो, आपण ती ऐकत राहतो. वॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्वीटर, रेडिओ, टीव्ही, मोबाइलवर येणारे मेसेजेस, रेल्वेमध्ये बाजूला बसलेले लोकही नानाविध माहिती शेअर करत असतात आणि याचाच मला आताशा कंटाळा येऊ लागला आहे. गरज नसेल तर ही माहिती घेऊन मी करू काय? मी ती नुसती ऐकत राहतो आणि विनाकारण त्याच्यावर विचार करून माझी शक्ती, ऊर्जा खर्च करत बसतो, ज्याचा मला कधीही फायदा होणार नसतो. ज्या गोष्टींवर विचार करून मला खरोखरच फायदा होणार असतो त्या गोष्टीही बाजूला पडतायत, असं वाटायला लागलं आहे. ज्या गोष्टीचा माणूस म्हणून, कलाकार म्हणून अभ्यास व्हायला हवा त्या गोष्टीकडे हळूहळू माझं दुर्लक्ष होतंय असं वाटायला लागलं आहे.

माझं सामाजिक भान हरपत चाललं आहे. त्या अनावश्यक माहितीमुळे मी नको तो ग्रह करून घेऊन जगतोय. माझ्या संवेदना अत्यंत गलिच्छ पद्धतीने मूळ धरतायत, असं वाटायला लागलंय. वॉट्सअ‍ॅपवर वाट्टेल ते मेसेज येतात आणि विनाकारण मी अस्वस्थ होऊन पोकळ राष्ट्रवाद, देशभक्तीला बढावा मिळतोय असं वाटतंय. मागे एकदा कुणी तरी मेसेज पाठवला की आपलं राष्ट्रगीत हे जगातल्या सर्व राष्ट्रगीतांमध्ये पहिलं आलं आहे. किती भंपक आहे हा विचार. मुळात राष्ट्रगीताची अशी स्पर्धाच कशी असू शकते? राष्ट्रगीताचा अर्थ काय असतो? ते त्या त्या राष्ट्राचं गौरवगीत असतं ना? आणि ते त्या राष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला प्रिय आणि अभिमानास्पदच असणार. त्यामध्ये स्पर्धा कशी काय असू शकते? म्हणजे इंग्लंडचं राष्ट्रगीत आणि भारताचं राष्ट्रगीत यात स्पर्धा कशी काय असू शकते? तर असे मूर्ख प्रकार घडतात आणि आपण तारतम्यभाव बाजूला ठेवून असे मेसेज फॉरवर्ड करत राहतो. काहीही विचार न करता. काहीतरी व्हिडीओ दाखवतात आणि त्याचा आगापिछा न पाहता पॅनिक होतात. माझ्यासाठी वॉट्सअ‍ॅप हे माहीत असलेल्या लोकांबरोबर निरोपाचे दळणवळण करण्यासाठी आहे. बाकीच्या भाकड गोष्टींसाठी नाही. मागे एकदा लोकलमधून पडणाऱ्या माणसाचा व्हिडीओ कुणीतरी पाठवला. मला गंमत वाटते. जो माणूस पडू घातलाय रेल्वेमधून त्याला वाचवण्यासाठी हात पुढे जायला हवा की त्या माणसाचा व्हिडीओ काढायला? ही असंवेदनशीलता कशी काय वाढीस लागली आहे? असल्या सनसनाटी गोष्टी कधी शूट करतोय आणि कधी वॉट्सअ‍ॅपवर टाकतोय असं का होतं लोकांना? अपघात झाल्यावर आधी मदतीसाठी का नाही पुढे जाणं होत? त्याचं शूटिंग करण्याकडे कसा काय आहे आपला कल? हे सगळं विषण्ण करणारं आहे. या असल्या असंवेदनशील, असहिष्णू, भाकड अर्थहीन गोष्टींमध्ये आपलं मन रमायला लागत आहे आणि ही सामाजिक, आरोग्यासाठी फार बरी गोष्ट नाही आहे.

आज उद्याने, रेल्वे स्टेशन, मोठमोठे मॉल, इथे वाय-फाय फ्री आहे. बहुतांश तरुण पिढी या सर्व ठिकाणी मोबाइलमध्ये गुंतलेली आपल्याला दिसते. हे तसंही बरं नाही. हॉटेलमध्ये फॅमिली जेवायला जाते. पण सगळेच्या सगळे त्या मोबाइलमध्ये अडकलेले दिसतात. काय असतं त्या मोबाइलमध्ये बरं. वॉट्सअ‍ॅपवरचे मेजेस, फेसबुकवरच्या लाइक्स, कमेंट्स, ट्वीटरवरचे मेसेज, कोण काय म्हणाले हे? मला वाटतं हे सगळे प्रकार आपल्याला वास्तवापासून दूर नेणारे आहेत. रमवणारे आहेत. मला नाही आवडतं वास्तवात जगायला. मला हे वरवरचं छानछान वाटणारं, मला गोंजारणारं जग मला आवडतंय. वॉट्सअ‍ॅपवर अनेक ग्रुपमध्ये मी असतो. प्रत्येक ग्रुपमध्ये मी काही सांगत असतो. आपलं मत मांडत असतो. फेसबुकवर तर सकाळी उठल्यापासून मी काय प्यायलो, काय खाल्लं इथपासून रात्री अंगावर कुठल्या रंगाची चादर घेऊन झोपतोय, इथपर्यंत पोस्ट आणि फोटो टाकत असतो आपण आणि दर तीन मिनिटाने कुणाची काय कमेंट आले की नाही, लाइक्स किती आल्या याच्यावर मी आनंदी होतो किंवा दु:खी होतो. किती भयानक आहे हे काल्पनिक जग याचा अंदाज येत नाही. आपल्याला मित्र नाक्यावर भेटतात, पण ते गप्पा नाही मारत, तर फेसबुकवर नाही तर अन्य सोशल मीडियावर असतात.

आपल्याकडचे सत्ताधीश लोक हे सगळं सोईस्करपणे करतायत असं वाटतं मला. समाजामध्ये काय घडतंय, आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचा आपल्याला विसर पडावा म्हणून तर हे सगळं नाही चाललेलं? जगामध्ये मोबाइल नेटवर्कचे आपल्या एवढे कमी दर कुठेही नाहीत. नेट एवढं स्वस्त कुठेही नाही. ३०० रु.मध्ये अमर्यादित फोन कॉल्स आणि नेट (एक जीबी रोज) कुठला तरुण अशी स्वस्तात सुविधा मिळाली तर वाहवत जाणार नाही? रेल्वे स्टेशनवर ७० टक्के लोक पोर्न साइट बघत असतात. हे सगळं कशाचं द्योतक आहे? आपला तरुण अस्वस्थ नाहीय. देश कुठे चाललाय? आपण काय केलं म्हणजे माझ्या पुढच्या समस्यांचे निराकरण होणार आहे, याच्यावर तो बोलत नाही. सरकार काय करतंय, त्याने काय केलं पाहिजे, याचं भान त्याला नाही. माझ्या काय गरजा आहेत, युवापिढी म्हणून मी काय जबाबदारी घ्यायला पाहिजे, हेही तो विचारात घेत नाही. मुंबई-पुणे या शहरांमधल्या तरुणांबद्दल हे सगळं नाहीय. उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू तरुण मुंबई-पुण्यामध्ये राहतच नाही. ते परदेशात जातात. तळागाळातला जो तरुण आहे, जो उर्वरित महाराष्ट्रात राहतो, त्याच्याबद्दल हे चाललेलं आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वास्तव त्यांना कळतही असेल. पण त्यावर विचार करण्याची त्यांची शक्तीच या सोशल मीडियाने घालवून टाकलेय. कोणी भारत-पाक क्रिकेटची मॅच हे राष्ट्रभक्तीचं आणि युद्धाचं उदाहरण मानत असेल, तर अशा लोकांची कीवच केलेली बरी.

आमच्या क्षेत्रातल्या एका निर्मात्याने आत्महत्या केली. बायकोच्या जाचाला कंटाळून असं त्याचं म्हणणं होतं. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकली की आत्महत्या करतोय तर लोकांनी चक्क लाइक केलं त्यांना. त्यावर तो म्हणाला ‘काय लोक आहेत, आत्महत्या करतोय असं सांगतोय तर लाइक काय करताय?’ पुढे त्याने आत्महत्या केली. मला भीती वाटली या सगळ्या प्रकाराची. मुळात आत्महत्या करू नये कुणीही. त्या निर्मात्याला ती आत्महत्या शेअर का करावीशी वाटली असेल? आत्महत्या करतोय, हे एखाद्या जवळच्या मित्राला अगर जवळच्या माणसांना का नाही फोन करून अथवा भेटून त्याला शेअर करावंस वाटलं? डायरेक्ट फेसबुक? आणि लोकांच्या लाइक्सवर ठरलं त्याचं आत्महत्या करणं. लोक म्हणाले असते की नको करू आत्महत्या आम्ही आहोत तुझ्याबरोबर. तू भेट आम्हाला. आपण मार्ग काढू. तर त्याने केली नसती आत्महत्या? मला हे सगळंच भीतीदायक वाटलं आणि हा सोशल मीडिया कुठपर्यंत घुसलाय आपल्यात याचं भान आलं. फेसबुकवर मी टाकलेल्या फोटोला लाइक्स नाही मिळाले किंवा कमेंट्स नाही आल्या तर मला अस्वस्थ व्हायला होतं का? ते माझं जगण्याचं निमित्त आहे का? नाही मला लोकांची मतं कळली तर काय फरक पडणार आहे? दोन-तीन-पाच हजार लाइक्स एवढाच माझा रीच आहे? जग खूप मोठं आहे. खूप लोक राहतात. असं काहीतरी चांगलं काम आपल्याकडून घडलं पाहिजे की साऱ्यांचं लक्ष माझ्याकडे, माझ्या कर्तृत्वाने गेलं पाहिजे. फेसबुकवरच्या वाह्य़ात पोस्टने नव्हे. तोंडाला येईल ती बडबड लोक करत असतात. लोक मागचापुढचा विचार करत नाहीत. का तर बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून? ट्वीटरला शेवटी त्या अभिजित नावाच्या गायकाला शेवटी बॅन आणावा लागला. काय चाललंय हे?
या सगळ्या भ्रमात ठेवणऱ्या प्रकारांची मला किळस आल्यामुळे मी माझं फेसबुक, ट्वीटर अकाउंट बंद करून टाकलं आहे. वॉट्सअ‍ॅपवर मला हवी आहेत तेवढीच आणि जी संवेदनशील आहेत ती माणसं आहेत आणि ज्या माणसांशी माझा संपर्क येतो किंवा ठेवता येतो, अशीच माणसं आहेत. तसेही लोक मला मागासलेला म्हणतात. मला चालतं ते. आपल्या माणसांशी, घरातल्या माणसांशी मोकळा संवाद साधणं कमी झालंय हे लक्षात येत नाहीये. आपला मोबाइल हा आपल्या सोयीसाठी आहे, सोशल मीडिया ही तुमची जगण्याची गरज कशी काय होऊ शकते? लोक वृत्तपत्र नाही वाचत. अवांतर वाचन बंद होत चाललंय. वाचन संस्कृती वाढवायला हवी. ती आहे तीच कमी व्हायला लागलेय.

आत्मनिरीक्षणासाठी जो वेळ काढायला हवा तो आहे कुठे आपल्याकडे? आपण आपल्याला तपासतोय मिळणाऱ्या लाइक्समधून आणि कमेंट्समधून आणि जे भ्रामक आहे. वास्तवाचं भान सोडून असलेलं. आपण काय आहोत, कुठे आहोत, कुठे जायला हवं, कुणासोबत जायला हवं, माझ्यासाठी आदर्श कोण असायला हवा, मी जगणं समृद्ध कुठल्या गोष्टींनी करू शकतो? मुलगा, बाप, भाऊ, मित्र, काका, मामा म्हणून माझ्या काय जबाबदाऱ्या आहेत या सगळ्यावर विचार व्हायला हवा. तरच आपण जास्तीतजास्त जबाबदार, कर्तव्यदक्ष, हक्कांसाठी सजग असणारे नागरिक म्हणून पुढे येऊ शकतो. समाजाप्रती, देशाप्रती माझी काय निष्ठा, भूमिका असली पाहिजे? नागरिकशास्त्र फक्त शिकण्यासाठी नाही तर ते आचरणात आणण्यासाठी आहे, हे लक्षात घ्यायला हवं आणि त्यासाठी सगळ्यात आधी पालकांनी मोबाइल खाली ठेवायला हवा, गरजेपुरता वापरायला हवा. मुलांना त्याची उपयुक्तता समजावून सांगा आणि उपद्रवही. देशात लोकशिक्षणाची प्रचंड गरज आहे, हे अनेक ठिकाणी फिरल्यावर लक्षात येतं. सतत मोबाइलवर राहणाऱ्या माणसांना कसं काय सामाजिक जाणिवेचं भान देणार? तर शक्यतो मोबाइलच्या सोशल मीडियापासून लांब राहा आणि नागरिक म्हणून, माणूस म्हणून समृद्ध होण्याकडे वाटचाल करा, तरच या देशामध्ये आज ना उद्या क्रांती घडेल.

वैभव मांगले – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा