नीलेश अडसूळ
२००० ते २०१० या काळात गरबा आणि सेलिब्रिटी हे एक समीकरण झाले होते. कधी आयोजकांकडून बोलावणे असायचे तर कधी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी जाणे व्हायचे. पण सेलिब्रिटी नाही असे गरबे अगदी तुरळकच आढळायचे. परंतु आज याच घटनेचा अगदी विरोधाभास पाहायला मिळतो. गरब्यांमध्ये असणारा कलाकारांचा वावर कमी झाला असे नाही तर अगदीच वावर नाही आहे, असे म्हणणे उचित ठरेल. यामागची कारणे काही कलाकारांशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतले सण आणि उत्सव ही कायमच एक कुतूहलाची आणि तितकीच अभिमानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे अनेक जातिधर्माचे लोक गेली अनेक वर्षे इथे गुण्यागोविंदाने राहात असल्याने प्रत्येकाचाच सण त्याच दिमाखात साजरा केला जातो. परंतु गेल्या काही वर्षांत उत्सवांच्या स्वरूपात झपाटय़ाने बदल होत आहेत आणि या बदलांचा परिणाम म्हणजे दिमाखात होणारे उत्सव आज तोकडे पडू लागले आहेत. मग त्याला कायद्याचे निर्बंध, उत्सवांचे विद्रूपीकरण, झालेला अतिरेक, सुरक्षेचे प्रश्न, आर्थिक घडामोडी अशी नानाविध कारणे देता येतील. याच सणांच्या यादीतील महत्त्वाचा सण म्हणजे नवरात्रोत्सव आणि त्यात होणारा दांडिया आणि गरबा. पूर्वी प्रत्येक विभागात, प्रभागात, चौकात, मोकळ्या मैदानात मोठमोठय़ा गरब्याचे आयोजन केले जायचे. हजारोंच्या संख्येने तरुणाई त्यात सामील होत होती. पण आज कुठे तरी हे चित्र पालटले आहे. अनेक गरब्यांना उतरती कळा लागली आहे. एवढेच नव्हे तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्ये होणाऱ्या गरब्यांनाही काही बोटावर मोजण्याएवढे लोक हजेरी लावत आहेत. आणि या सगळ्या चित्रात मोठय़ा प्रमाणात उणीव भासते ती आपल्या मराठी कलावंतांची. २००० ते २०१० या काळात गरबा आणि सेलिब्रिटी हे एक समीकरण झाले होते. कधी आयोजकांकडून बोलावणे असायचे तर कधी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी जाणे व्हायचे. पण सेलिब्रिटी नाही असे गरबे अगदी तुरळकच आढळायचे. परंतु आज याच घटनेचा अगदी विरोधाभास पाहायला मिळतो. गरब्यांमध्ये असणारा कलाकारांचा वावर कमी झाला असं नाही तर अगदीच वावर नाही आहे, असे म्हणणे उचित ठरेल. यामागची कारणे काही कलाकारांशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
याविषयी अभिनेत्री क्रांती रेडकर सांगते, ‘गरबा, दहीहंडी किंवा तत्सम काही सोहळे हे सामाजिक संस्थांकडून आयोजित केले जातात. मग त्यात काही राजकीय घटकांचाही सहभाग असतो किंवा काही धनिकांकडून अशा सोहळ्यांना आर्थिक पाठबळ दिले जायचे. त्यामुळे कोणताही उत्सव हा दिमाखात साजरा करणे हे सहज शक्य होते. परंतु आज ही आर्थिक फळीच कमकुवत झाली आहे. आणि महाराष्ट्रात अनेक अडचणी, नैसर्गिक आपत्ती असे प्रसंग घडत असताना, सोहळ्यापेक्षा जो आहे तो पैसा सामाजिक उपक्रमांकडे वळवण्याकडे सगळ्यांचा कल आहे. आपण आज समाजमाध्यमांच्या इतके जवळ आहोत की हे कार्य झपाटय़ाने लाखो लोकांपर्यंत सहज पोहोचते. त्यामुळे गुंतवणूकदारालाही कुठे गुंतवणूक करायची याचे बहुपर्याय उपलब्ध झाले आहेत. लोकांच्याही सामाजिक जाणिवा दृढ होत चालल्या आहेत त्यामुळे या कामांना जनतेकडून अधिक पसंती मिळते, असे सांगतानाच काळानुसार होणारा बदल हा स्वीकारायला काहीच हरकत नाही. कारण आम्हाला सोहळ्यात बोलावून दिल्या जाणाऱ्या मानधनापेक्षा समाजोपयोगी काही तरी घडतेय याचा आनंद निश्चितच आहे,’ असे क्रांती म्हणते.
पूर्वी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी गरब्यांमध्ये जाणे व्हायचे, पण आता माध्यमांचे स्वरूप विस्तारत गेल्याने निर्मात्यांपुढेही प्रसिद्धीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. एका क्लिकवर चित्रपटाच्या घडामोडी घराघरात पोहोचतात. मुख्यत्वे उपलब्ध असलेले नानाविध ‘पर्याय’ हा घटक या बदलत्या स्वरूपाला कारणीभूत आहेत. आणि गरबा म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण टीम घेऊ न जाणे, प्रवासखर्च, राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च यामुळे एकंदर खर्च अधिकच वाढत जातो. प्रसिद्धीवर होणारा खर्च आणि मराठी सिनेमांना मिळणारा नफा या गणिताचा निर्मात्याला विचार करावाच लागतो. दहीहंडीला सेलिब्रिटी हे आकर्षणबिंदू बनतात, पण गरब्यात मात्र प्रत्येक जण खेळण्यात गुंग असतो. त्यामुळे कोण आले कोण गेले याचे भानही कुणाला नसते. विशेष म्हणजे समाजमाध्यमांमुळे सेलिब्रिटींविषयी वाटणारे आकर्षणही कमी झाले आहे. पूर्वी कलाकार कुठे दिसत नसत त्यामुळे ते कुठे दिसले की तो कुतूहलाचा विषय असायचा. आता मात्र त्यांची मिनिटामिनिटाची माहिती मिळत असल्याने कलाकारांकडे बघण्याचा लोकांचाही दृष्टिकोन बदलल्याचे दिसते. याबाबतीतली एक आठवणही क्रांतीने सांगितली. एकेकाळी क्रांतीच्या बरोबरीने अनेक मराठी चित्रपट-मालिका अभिनेत्री या गरबा-दांडिया उत्सवात हजेरी लावत होत्या.
काळानुसार आलेली आर्थिक मंदी हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे, असे अभिनेत्री आदिती सारंगधर सांगते. सार्वजनिक उत्सव म्हटले की खर्चाचाही डोंगर वाढत जातो. आणि गरबाच नाही तर सगळ्या सार्वजनिक आणि सामाजिक सोहळ्यांची आज अशीच अवस्था आहे. आर्थिक बाजूनेच नाही तर आयोजक किंवा सामान्य नागरिकांच्या बाजूनेही चूक आहे. उत्सवांना विदारक स्वरूप येत चालले होते, सुरक्षेचा प्रश्न तर होताच. त्यामुळे शासन आणि कायद्याने घालून दिलेल्या र्निबधात उत्सव करणे काहीसे कठीण जाणारच. पण कधी तरी ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्यही वाटतात आणि लोकांनाही चार पर्याय उपलब्ध झाल्याने निवडीचे स्वातंत्र्य मिळाले आहे. जिथे चांगली व्यवस्था, सुरक्षा आणि त्यांच्या पसंतीला उतरेल असे आयोजन असेल तिथेच लोक जातात. पूर्वीसारखा बारा आणि एक वाजेपर्यंत चालणारा गरबा आज राहिला नाही. कायद्याकडून असलेले दहाचे बंधन मुंबईकरांना तर पाळणे शक्यच नाही. कामावर जाणाऱ्या माणसाला घरी यायलाच दहा वाजतात तिथून पुढे तो जाणार कधी आणि खेळणार कधी? आज सातपर्यंत मालिकांचे चित्रीकरण चालते आणि तिथून पुढे वाहतूक कोंडीतून वाट काढत गरब्यात जाईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे आयोजकांनी बोलावले तरी कलाकारांना गरब्यात जाणे शक्य होईलच असे नाही, असे अदिती म्हणते.
मुंबईत राहिलेला आणि इथेच वाढलेला अभिनेता सुशांत शेलार गेली दहा वर्षे ठाण्यामध्ये नि:शुल्क गरब्याचे आयोजन करतो आहे. गरब्याविषयी तो म्हणतो, माझे बालपण लोअर परळला गेल्याने चाळ संस्कृतीतले उत्सव मी जवळून पाहिले आहेत. लहानपणी मी एक देवीची मूर्ती घरात आणून बसवली होती. पुढे ती मंडळात स्थापन केली. आज कलाक्षेत्रात वावरत असतानाही उत्सवांविषयी असणारे ते प्रेम अद्याप कमी झाले नाही. एकेकाळी ज्या देवीला मी सेलिब्रिटी म्हणून गेलो होतो त्याच देवीची सेवा गेली दहा वर्षे करतो आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यात भरवला जाणाऱ्या नि:शुल्क गरब्याला रोज पाच हजारांहून अधिक लोक येतात. कुटुंबासहित तरुणाईही मोठय़ा विश्वासाने आमच्याकडे येते याचा मला आनंद आहे, मात्र आता मुंबईतले गरबेही कमी होताना मी जवळून पाहतो आहे, असे तो म्हणतो. रस्ते अरुंद होत चालले आहेत, जिथे तिथे वाहतूक कोंडी, मंडपाचे परवाने मिळत नाहीत, मैदानाचे भाडे परवडत नाही, अशा परिस्थितीत पैसे लावून गरबा करायचा झाला तर पाचशे रुपयांहून अधिक तिकीट लावावे लागेल आणि एवढे पैसे खर्च करून कोणताच सामान्य माणूस गरबा खेळायला येऊ शकत नाही. त्यात आवाजावर आलेल्या र्निबधामुळे जरा कुठे आवाज जास्त झाला तर लगेच तक्रार केली जाते. या र्निबधामुळे एकंदरीतच उत्सवांमध्ये सहभागी होण्याचा सामान्यांचा आणि कलाकारांचाही उत्साह कमी झाला आहे, असे मत सुशांतने व्यक्त के ले. काही कलाकार मात्र आजही माझ्या मैत्रीला जागून दरवर्षी आमच्या गरब्यात येतात आणि लोकांबरोबर फेरही धरतात, असेही त्याने सांगितले.
‘मराठी दांडिया’ ही संकल्पना २००० साली प्रथम सुरू करण्यात आली त्याचा मीही एक घटक होतो. सुरुवातीला ‘अल्फा दांडिया’ म्हणून एल्फिन्स्टनच्या मैदानात हा सोहळा केला जायचा. पुढे पुढे अनेक संस्थांचे सहकार्य मिळत गेले, पण हे करताना एक लक्षात आले की, ज्या वेळी शासनाने १० वाजता आवाज बंद करण्याचा निर्बंध घातला तेव्हापासून या उत्सवाला उतरती कळा लागली. येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्याने आयोजनावरही मर्यादा आल्या. प्रायोजकांचे हातही पैसे देताना आखूड झाले. मग नुकसान सहन करून किती वर्ष उत्सव करायचा, असा प्रश्न पडू लागला आणि २०१० साली अखेर या गरब्याचा सोहळा थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतला. आजचे अर्थकारण आणि वेळेचे गणित बदलले आहे. वाहिन्या वाढल्या, कलाकारांचे काम वाढले त्यामुळे आता अशा गरब्यांना कलाकारही किती वेळ देऊ शकतील यात शंका आहे. कलाकारांनाच नव्हे तर सामान्य माणसांनाही वेळ काढून अशा ठिकाणी जाणे कठीण झाले आहे.
– आदेश बांदेकर, अभिनेता-निर्माता