अमृता खानविलकर

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझी एण्ट्री झाली ती ‘गोलमाल’ या चित्रपटाने; पण त्या दरम्यान मी अजिबात फॅशन कॉन्शिअस नव्हते. अगदी कोणत्या जीन्सवर कोणता टॉप घालावा हेही मला कळायचं नाही. शिवाय सतत छान छान कपडे विकत घेता येतील इतके पैसेही तेव्हा नव्हते आणि कधी पैसे असले तर फॅशन सेन्स अजिबात नव्हता. माझा आज जो काही फॅशन ऑरा तुम्हाला दिसतो, त्याचं पूर्ण श्रेय माझ्या नवऱ्याला म्हणजे हिमांशु मल्होत्राला जातं.

अगदी सुरुवातीपासूनच मी कसं प्रेझेंटेबल राहायला हवं याकडे हिमांशुने लक्ष दिलं. ‘ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण आहोत तिथे आपण स्वत:ला कसे सादर करतो हे खूप महत्त्वाचे आहे,’ असं हिमांशु मला सतत सांगत असायचा. पहिल्यांदा असं वाटायचं की, लोक हे किती नोटीस करतायत किंवा इथे याची गरज वाटतेय का? पण तरीही हिमांशुच्या हट्टापायी माझा प्रत्येक पब्लिक अ‍ॅपीअरन्स नेहमी स्टायलिश, ट्रेण्डी ठेवण्याचा मी प्रयत्न केला आणि अर्थात लोकांचं त्याकडे लक्ष गेलं. त्यानंतर अनेक मुलाखतींमध्ये मला माझ्या चांगल्या फॅशन सेन्सवर प्रश्नही विचारण्यात आले. तेव्हा कळलं की, आपण जे सेट करायचा प्रयत्न करत आहोत ते इथे रुळायला हळूहळू सुरुवात झाली आहे.

वाचा : मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ चित्रपट ‘ऑस्कर’च्या शर्यतीत

त्यानंतर ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ हा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. त्यात पुन्हा माझं विचारचक्र सुरू झालं. इथे तर संपूर्ण कार्यक्रमाची धुरा माझ्या हाती होती. कार्यक्रमाचा निवेदक लोकांना आवडणं फार महत्त्वाचं असतं! अमेरिकन शोचे निवेदकदेखील खूपदा लोकप्रिय होतात, ते त्यांच्या सुंदर सादरीकरणामुळे आणि पेहरावामुळे, हे मी पाहिलंय. त्यामुळे आपणही अशाच प्रकारे काही तरी व्यवस्थित करावं या हेतूने मी माझ्या निवेदन शैलीसोबत माझे कपडे आणि मेकअप याकडे मी लक्ष द्यायचं ठरवलं. तिथेही फॅशनेबल अँकरचं हे गणित चांगलं जमून आलं! त्यानंतर चित्रपट आणि त्यांचे प्रमोशन हा प्रवासही अगदी ग्लॅमरस झाला. ‘मराठीला खऱ्या अर्थाने ग्लॅमरस बनवणारी अभिनेत्री’ ही ओळख आता मीडियामध्येही होऊ लागली आणि लोकांनीही हे मान्य केलं ते विशेष! तेव्हा ही मेहनतीची पोचपावती मिळतेय असं वाटलं.

वाचा : ‘द कपिल शर्मा शो’ पाहायचा आहे, मग २०१८ ची वाट पाहा!

निव्वळ एका भाषेपुरती मर्यादित राहणारी अभिनेत्री ही ओळख मला नको होती. अर्थात मराठी माझं पहिलं प्रेम आहे यात शंका नाही, पण अभिनेत्री म्हणून मला कोणत्याही भाषेची बंधनं अजिबात नको होती. त्याचा पुढचा टप्पा म्हणून मला ‘नच बलिये’ करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये तर वेगवेगळ्या परफॉर्मन्सनुसार कपडे आणि मेकअप ठरत होते. नृत्य हा विषयच माझ्या इतक्या जिव्हाळ्याचा होता, की मी त्यातच खूश होते. त्यातच त्यानुसार ठरणाऱ्या कपडय़ांसाठी तर माझा उत्साह नेहमीच जास्त असायचा.

आपण नेहमी असा विचार करतो की, आपण काहीही परिधान केलं तरीदेखील लोक आपलं बोलणं ऐकतीलच, कारण आपण खूप छान बोलतो, तर असं अजिबात नाही. खरं तर मला असं वाटतं की, अनेकदा आपलं बोलणं दुर्लक्षित होऊ शकतं, कारण आपलं राहणीमान लोकांच्या नजरेत येईल इतकं छान नाहीये. त्यामुळे जर लोकांनी आपलं म्हणणं ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल तर एक ड्रेसिंग सेन्स स्वत:साठी तयार करणं हे खूप गरजेचं आहे!

सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com@AmrutaOfficial