बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतने गळफास लावून आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान अभिनेत्री सेलिना जेटली हिने सुशांतच्या नैराश्यावर भाष्य करताना त्याच्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली. सुशांतने टोकाचं पाऊल उचललं नसतं तर तो भारतासाठी ऑस्कर घेऊन आला असता असंही ती म्हणाली.
हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सेलिनाने नैराश्यावर भाष्य केलं. ती म्हणाली, “नैराश्य ही अत्यंत वाईट स्थिती असते. व्यक्ती कितीही श्रीमंत असो किंवा गरीब तो नैराश्यामुळे भरडला जातो. त्याची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. अनेकदा तो चूकीचे निर्णय घेतो. हा अनुभव मी देखील घेतला आहे. सुशांतची देखील अशीच अवस्था झाली असेल. म्हणूनच त्याने असं टोकाचं पाऊल उचललं. अन्यथा अभिनयात इतका तरबेज असलेला एक यशस्वी अभिनेता आत्महत्येचा विचार का करेल? त्याचा अभिनय पाहून मला वाटायचं सुशांत एक दिवस सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव नक्की कोरेल.”
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. त्याच्या आत्महत्येचा कायदेशीर तपास करावा अशी मागणी अनेक कलाकार आणि राजकारणी मंडळी करत आहेत. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.