सध्या तामिळ अभिनेता विशाल प्रचंड चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याने सेन्सॉर बोर्डावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप होय. २८ तारखेला त्याने एक व्हिडीओ शेअर करत सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱ्यांना साडेसहा लाख रुपयांची लाच द्यावी लागली, त्यानंतर चित्रपटासाठी प्रमाणपत्र मिळाल्याचा आरोप केला होता. त्याने व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे व पंतप्रधान मोदींना या भ्रष्टाचार प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. आता सेन्सॉर बोर्डाने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.




अभिनेता विशालच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल सीबीएफसीने म्हटलं, “ऑनलाइन सर्टिफिकेशन सिस्टिम असूनही चित्रपट निर्माते, अर्जदारांसाठी नवीन प्रणालीतील सुधारणांबद्दल नियमित अपडेट देऊनही ते अजून मध्यस्थ किंवा एजंटच्या माध्यमातून अर्ज करणं पसंत करतात. हे या प्रक्रियेत तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग काढून टाकण्याच्या उद्देशाच्या विरुद्ध आहे. पण तरीही आम्ही हे आरोप अतिशय गांभीर्याने घेतले आहेत. CBFC भ्रष्टाचार अजिबात सहन करत नाही. तसेच, कोणीही यात सामील आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, CBFC ची प्रतिमा मलीन करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.”
वाचा पूर्ण स्टेटमेंट –
“चित्रपट निर्मात्यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी त्यांचे नियोजित करण्यापूर्वीच सर्टिफिकेशनसाठी अर्ज करावा. जेणेकरून त्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळेल. अगदीच तातडीच्या अत्यंत प्रकरणांमध्ये, निर्माते सीबीएफसीच्या उच्च अधिकार्यांकडे वाजवी कारण देऊन लेखी विनंती करू शकतात,” असंही या निवेदनात म्हटलं आहे.