सगळी दु:ख विसरुन सर्वांना खळखळून हसायला लावणारा झी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनावर राज्य केले आहे. या कार्यक्रमात आजवर मराठी चित्रपटसृष्टीसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. तसेच कार्यक्रमातील निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या मनावर जाणू काही जादूच करत आहेत. पण ‘कसे आहात सगळे, हसताय ना… हसायलाच पाहिजे’असे म्हणत प्रेक्षकांची मोठ्या आपुलकीने विचारपूस करणारा निलेश साबळे आता घराघरात पोहोचला आहे. लाखो तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या निलेशची पत्नी कशी दिसते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
२०१० मध्ये निलेश साबळे विवाहबद्ध झाल्याचे म्हटले जाते. त्याची पत्नी गौरी साबळे ही दिसायला अतिशय सुंदर आहे. तिने निलेशला त्याच्या कारकिर्दीतील आलेल्या चढ- उतारांमध्ये साथ दिली आहे. निलेश आणि गौरी दोघेही सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात.
मराठी कलाविश्वात निलेश साबळे हे नाव सध्या बरेच चर्चेत असते. डॉक्टर पासून विनोदी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक असा निलेशचा प्रवास फारच रंजक आहे. आयुर्वेदाची एम. एस ही पदवी घेतल्यानंतर कोल्हापूर जवळील एका गावातून थेट मुंबईला आला होता. त्याने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमातून नावारुपास आल्यावर त्याने ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर त्याने ‘नवरा माझा भवरा’ या चित्रपटातही काम केले आहे. यशाची एक- एक पायरी चढत आता तो ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. आज त्याचे लाखो चाहते आहेत.
सध्याच्या घडीला चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम महाराष्ट्रातीलच नाही तर, जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. फक्त मराठी कलाविश्वापुरताच मर्यादीत न राहता या कार्यक्रमाच्या कक्षा बऱ्याच रुंदावल्या आहेत. टीआरपीच्या बाबतीतही हा कार्यक्रम बऱ्याच मालिकांना टक्कर देत असल्याचे दिसत आहे.