अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र दररोज या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असते. सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या मित्रमंडळींनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्येच आता ‘छिछोरे’चं क्रेडिट न मिळाल्यामुळे सुशांत नाराज झाला होता, असं प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी म्हटल्याचं ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तात असं नमूद करण्यात आलं आहे.
“बॉक्स ऑफिसवर ‘छिछोरे’ या चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपट लोकप्रियदेखील ठरला. मात्र यासाठी सुशांतला कोणीच क्रेडिट दिलं नाही. पण बिचारा सुशांत काही बोलूसुद्धा शकत नव्हता. तो नाराज होता आणि याविषयी त्याने दिग्दर्शक अभिषेक कपूरसोबत देखील चर्चा केली होती”, असं चेतन भगत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “काही ठराविक पत्रकारांचादेखील एक व्हॉट्स अॅप ग्रुप आहे. यामध्ये ६ पैकी चार पत्रकार तर कायम सुशांतविषयी नकारात्मक लेख लिहायचे. अनेक दे सुशांतविषयी ब्लाइंड आर्टिकल लिहीत होते जे संपूर्ण कलाविश्वात वाचलं जाई. त्यामुळे सुशांत त्रासला होता. याविषयी देखील सुशांतने अभिषेकला सांगितलं होतं. अभिषेक कपूर आणि सुशांतने ‘काइ पो छे’ आणि ‘केदारना’थ या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं”.
दरम्यान, सुशांतने आत्महत्या करुन जीवन संपवलं यावर विश्वास ठेवणं खरंच कठीण आहे. सुशांत प्रकरणात जे काही दिसून येतंय ते प्रत्यक्षात वेगळं आहे असं माझं मत आहे, असंही चेतन भगत म्हणाले. सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयची विशेष टीम तपास करत असून रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.