अभिनय क्षेत्रात आज असंख्य कलाकार आहेत ज्यांनी कलाप्रदर्शनाच्या एका संधीसाठी दिवसरात्र संघर्ष केला आहे. परंतु काही नशीबवान कलाकार असेही आहेत. ज्यांना एका रात्रीत संधी आणि पुढच्याच दिवशी नावलौकिक मिळतो. अभिनेत्री क्लोइ ग्रेस मोरेट्ज ही देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. परंतु आज वयाच्या विसाव्या वर्षी तिने आपल्या कारकीर्दीला अर्धविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी समाजमाध्यमांवर आपली नाराजी व्यक्त केली, परंतु क्लोइ आपल्या निर्णयावर ठाम आहे. वयाच्या आठव्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या क्लोइने ‘हार्ट ऑफ द बिहोल्डर’, ‘टुडे यू डाय’, ‘द थर्ड नेल’, ‘द आय’, ‘द पोकर हाउस’, ‘डार्क पॅलेस’सारख्या साठपेक्षा जास्त चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. आज हॉलीवूडमधील सर्वात महागडय़ा कलाकारांच्या यादीत तिचे नाव घेतले जाते आणि तरीही तिने हा निर्णय घेतला आहे. क्लोइच्या मते तिने आई-वडिलांशी विचारविनिमय करून काही काळ काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांची प्रवृत्ती चंचल असते. ते एका जागी टिकतीलच असे नाही. दुसरा एखादा कलाकार त्यांना आवडला की ते त्याच्या मागे जातात. आजवर शेकडो बालकालाकार आले, पण लिओनार्दो दी कॅप्रिओ, एलिझाबेथ टेलर, ड्रयू बॅरीमोर, जेसन बेटमन, जोडी फोस्टर, रायन गॉसलिंगसारखे काही मोजकेच कलाकार आहेत ज्यांना अजूनही हे यश टिकवता आले आहे. कारण ते नशिबाने नव्हे तर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोठे झाले होते. अशा कलाकारांपैकी एक बनायचे असेल तर कुठल्याही एका विशिष्ट व्यक्तिरेखेत अडकून न पडता अभिनयाचे तंत्रशुद्ध शिक्षण घ्यायचा निर्णय तिने घेतला आहे. आता ती वीस वर्षांची असल्याने तिच्याकडे अजूनही बराच वेळ आहे. कुठल्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी योग्य शिक्षणाची गरज असल्यानेच तिने थोडं थांबून अभिनयाचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2017 रोजी प्रकाशित
अवघ्या विसाव्या वर्षी हॉलीवूडला रामराम
विसाव्या वर्षी तिने आपल्या कारकीर्दीला अर्धविराम देण्याचा निर्णय घेतला
Written by मंदार गुरव

First published on: 20-08-2017 at 03:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chloe grace moretz hollywood katta part