सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७१ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांची अखेरची पोस्ट चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ दिवसांपूर्वी सरोज खान यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहिली आहे. मी सुशांतसोबत कधी काम केलेले नाही. पण आम्ही बऱ्याचवेळा भेटलो आहोत. सुशांतने इतके टोकाचे पाऊल उचल्यामुळे मला धक्काच बसला असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरोज खान या हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणे असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले होते. इतकच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचेही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केले.

१९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तसंच सरोज खान यांना आतापर्यंत ३ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Choreographer saroj khan last post avb
First published on: 03-07-2020 at 17:32 IST