आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकतंच त्यांच्या प्रकृतीबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांचे मित्र आणि कॉमेडियन शेखर सुमन यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

कॉमेडियन शेखर सुमन यांनी नुकतंच राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. यात ते म्हणाले, “राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कालच्या तुलनेत त्यांची प्रकृती आज बरी आहे. सर्वोत्तम डॉक्टर, न्यूरोसर्जन्स त्यांची काळजी घेत आहेत. पण पूर्वीपेक्षा आता त्यांच्या तब्येतीत बराच फरक पडल्याचे दिसत आहे.”
Comedian Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; ब्रेन डेड झाल्याची भीती, सुनिल पालची माहिती

“राजू श्रीवास्तव यांची इच्छाशक्ती फार प्रबळ आहे आणि त्या जोरावर ते याच्याशी लढतील. आता त्यांचे अवयवही काम करत आहेत. जरी ते बेशुद्ध असले तरी त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. देवाने आम्हा सर्वांच्या प्रार्थना ऐकल्या. हर हर महादेव”, असे शेखर सुमन यांनी म्हटले आहे.

राजू श्रीवास्तव यांचे मित्र आणि निकटवर्तीय सुनील पाल याला एका मुलाखतीत त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “जो व्यक्ती संपूर्ण जगाला हसवतो, तो इतका काळ गंभीर राहू शकत नाही. तो लढाऊ प्रवृत्तीचा आहे आणि तो नक्की परत येईल याची मला खात्री आहे.”

विश्लेषण : रिक्षाचालक ते स्टँडअप कॉमेडियन, राजू श्रीवास्तवचा प्रवास जाणून घ्या

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.

राजू यांना सर्वात मोठे यश मिळाले ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये, जिथे ते उपविजेते होते. ‘गजोधर भैया’ हे त्यांचे प्रचलित पात्र जे आजही अनेकांच्या लक्षात आहेत. याव्यक्तिरिक्त त्यांनी अमिताभ बच्चन, लालू प्रसाद यादव, राम देव बाबा यांच्या नकला करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच त्यांनी ‘शक्तीमान’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी का महा मुकाबला’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये काम केले.