टेलिव्हिजन विश्वात विनोदाची परिभाषा बदलणारा एक कार्यक्रम म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. विनोदवीर कपिल शर्मा आणि त्याचा हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी ओळखला जातो. पण, गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमातून बऱ्याच महत्त्वाच्या कलाकारांनी एक्झिट घेतली आहे. त्याचा थेट परिणाम कपिल शर्मा शोच्या टीआरपीवरही झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कपिलच्या करिअरला लागलेलं हे ग्रहण कधी दूर होणार हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. त्यातच आता त्याच्या शोमधील आणखी एक महत्त्वाची कलाकार म्हणजेच सुमोना चक्रवर्तीसुद्धा शो सोडण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात होतं. याविषयी खुद्द सुमोनानेच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

कपिलच्या शोमधून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चांविषयी आणि त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या कृष्णा अभिषेक याच्या ‘द ड्रामा कंपनी’ या कार्यक्रमात काम करणार का? याविषयीचा प्रश्न विचारला असता तिने या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं. सुमोना तिच्या निर्णयावर ठाम असून, ‘मी त्याच्या (कृष्णाच्या) कार्यक्रमात काम करणार नव्हतेच आणि यापुढेही करणार नाहीये’, असं म्हणाली. त्यासोबतच हा कार्यक्रम बंद होत असल्याच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं तिने स्पष्ट केलं. ‘कार्यक्रम बंद होणार वगैरे या सर्व अफवा आहेत. मी स्वत: या कार्यक्रमाचं चित्रीकरणात व्यग्र आहे’, असं म्हणत तिने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द कपिल शर्मा शो’च्या सुरुवातीपासूनच सुमोना या कार्यक्रमाचा एक भाग होती. सुनील ग्रोवरसोबत कपिलचा वाद झाल्यानंतर जेव्हा सहकलाकारांनी कपिलच्या शोकडे पाठ फिरवली त्यावेळी सुमोनाने मात्र कपिलला साथ देत त्याच्याच कार्यक्रमात काम करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत सांगताना सुमोना म्हणाली, ‘सुनील खूप चांगला आहे आणि सहाजिकच कार्यक्रमात त्याची गैरहजेरी भासतेय. एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही सलग ३-४ वर्षे काम केल्यानंतर त्याच्यासोबत तुमचं एक खास नातं तयार होणं स्वाभाविकच आहे. पण, कोणीतरी म्हटल्याप्रमाणेच कोणाच्या जाण्याने कार्यक्रम थांबत येत नाही. ‘द शो मस्ट गो ऑन’ ते खरंच आहे.’