ख्यातनाम संगीतकार इलयाराजा यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने सोमवारी चेन्नईमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘मेस्ट्रो’ या नावाने ओळखले जाणारे ७० वर्षीय इलयाराजा यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या इलयाराजा यांनी नुकतेच ‘थलाईमुरईगल’ या तमिळ चित्रपटाला संगीत दिले होते. गेल्या ४० वर्षांपासून अनेक तमिळ आणि हिंदी चित्रपटांना संगीत देणाऱ्या इलयाराजा यांनी रजनीकांत व कमल हसन या तमिळ चित्रपटांमधील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत सर्वाधिक काम केले. ‘सदमा’, ‘चीनी कम’ आणि ‘पा’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटांना त्यांनीच संगीतबद्ध केले.