Atharva Sudame Controversy Danny Pandit Shares New Video : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रीलस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अथर्व सुदामेने गणेशोत्सवापूर्वी हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मोठा वाद निर्माण झाला. त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं, ब्राह्मण महासंघाने देखील अथर्वच्या व्हिडीओवर आक्षेप नोंदवला होता. यानंतर अथर्वने हा एकतेचा संदेश देणारा व्हिडीओ डिलीट करून सर्वांची माफी मागितली.

आता अथर्व सुदामेला पाठिंबा देण्यासाठी त्याचा मित्र धावून आला आहे. प्रसिद्ध रीलस्टार डॅनी पंडितने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणारा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे जाणून घेऊयात…

डॅनी पंडितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सगळे कुटुंबीय एकत्र बाप्पाची आरती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बाप्पाचं आगमन झाल्यामुळे सगळे मनोभावे गणरायाची पूजा करत असतात. इतक्यात, एका लहान मुलीला तिची आई दरवाजातून आवाज देते ‘झोया’…; यानंतर सगळेच शांत होतात. बाप्पाची आरती सोडून ही चिमुकली मध्येच निघून गेली याचं सगळ्यांना काहीसं वाईट वाटतं. पण, ही चिमुकली काही वेळाने परत येते. तेव्हा तिच्या हातात एक ताट असतं.

डॅनी ताट उघडून पाहतो तर त्यात उकडीचे मोदक दिसतात. यावर, डॅनी झोयाला विचारतो हे मोदक कोणी दिले? ती म्हणते अम्मीने…बाप्पासाठी तिच्या आईने खास मोदकांचा प्रसाद पाठवलेला असतो. झोयाच्या मागोमाग तिची आई सुद्धा डॅनीच्या घरी येऊन सर्वांना प्रसाद देते, असं रीलच्या शेवटी पाहायला मिळतं. या व्हिडीओमधून डॅनीने गणेशोत्सवात हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला आहे. अथर्व सुदामेचा व्हिडीओ डिलीट झाल्यावर आता डॅनीने शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

डॅनीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या असंख्य कमेंट्स आल्या आहेत. “डॅनी सलाम आहे तुला”, “तुझा मित्र चुकीचा नव्हता हेच या व्हिडिओमधून तू दाखवलंय”, “गणेशोत्सव… ऐक्य एकता.. यासाठीच सुरू झाला होता…”, “अथर्वला मिळालेल्या Hate नंतर ही reel बनवल्याची ताकद” अशा असंख्य प्रतिक्रिया या युजर्सनी या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये शेअर केल्या आहेत.

danny
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अथर्वने शेअर केलेला व्हिडीओ नेमका काय होता?

अथर्व, गणेशोत्सवानिमित्त गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी जातो. त्यातली एक मूर्ती अथर्व बूक करतो. यावेळी मूर्तीकाराचा मुलगा त्याला अब्बू अशी हाक मारतो. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता. पण, अथर्व त्याला सांगतो… मला तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे. पुढे तो म्हणतो, “माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही. तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील…” या रीलवरुन अथर्व सुदामेवर हिंदुत्वाद्यांकडून टीका करण्यात आली. त्यामुळे माफी मागून अथर्वने हा व्हिडीओ आता डिलिट केला आहे.