बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘दे धक्का २’ हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘दे धक्का २’ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकतंच लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे देताना कलाकारांनी अनेक किस्सेही सांगितले.

‘दे धक्का २’ चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. २००८ साली ‘दे धक्का’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘दे धक्का’ चित्रपटाच्यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव नवखा कलाकार होता. मराठी चित्रपटसृष्टीत त्याने नुकतंच पाऊल ठेवलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या करिअरलाही सुखद धक्का मिळाल्याचं सिद्धार्थने सांगितलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा सिद्धार्थचा एक किस्सा अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी सांगितला. ते म्हणाले “शरीरयष्टी सुधारण्यासाठी सिद्धार्थ तेव्हा खूप व्यायाम करायचा. ‘दे धक्का’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी सिद्धार्थने नाश्त्याला तब्बल १२ ऑम्लेट खाल्ले होते. हे पाहून हा खूप खतरनाक माणूस आहे असं आम्हाला वाटलं होतं. आता तो एकदम फिट आहे”. मकरंद अनासपुरेंनी सिद्धार्थचा हा किस्सा सांगितल्यानंतर एकच हशा पिकला.

‘दे धक्का’ चित्रपटात कुस्ती खेळणारा किस्ना रोज १२ अंडी खाताना दाखवला आहे. सिद्धार्थ जाधवने १२ ऑम्लेट खाल्यानंतर ‘दे धक्का’मधील किस्नाला अंडी खायला दाखवतानाची कल्पना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना सुचली असल्याचंही मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक गमतीदार किस्से यावेळी कलाकारांनी शेअर केले.

हेही पाहा : ‘दे धक्का २’ टीमची लंडनमध्ये धमाल; शूटिंगदरम्यानचे फोटो पाहिलेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दे धक्का २’ चित्रपट लंडनमध्ये चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटात इतर कलाकारांसोबतच महेश मांजरेकर, प्रवीण तरडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘दे धक्का’प्रमाणेच या चित्रपटाचा सिक्वेलही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे.