बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू झळकविण्यासाठी सज्ज झाली आहे. हा कोणता बॉलिवूडपट नसून यावेळी ती हॉलिवूड चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे, ही यातील खास बाब आहे. xXx: Return of Xander Cage हा तो हॉलिवूडपट असून दीपिकाने चित्रपटाचा टिझर आपल्या इंन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केले आहे. या चित्रपटाद्वारे ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रियांका चोप्रानंतर भारतातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून फोर्ब्स मासिकाच्या यादीत दीपिकाचे नाव झळकले होते. या हॉलिवूडपटात दीपिका हॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता विन डिझेलसोबत अभिनय करताना दिसेल. “#Serena #xXx: Return of Xander Cage.” अशा स्वरुपाची कॅप्शन दीपिकाने शेअर केलेल्या टिझरसोबत लिहिली आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होता आहे.

दरम्यान, या चित्रपटातील महत्त्वपूर्ण क्लायमॅक्स सीनच्या चित्रीकरणासाठी दीपिकाने अत्याधुनिक बनावटीच्या रायफल्स हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले होते. रायफल चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी माईक नावाच्या लष्करी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. सहा आठवड्यांपेक्षा अधिक काळ तिने हे प्रशिक्षण घेतले. चित्रपटात सेरेना नावाच्या शिकारी मुलीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाला चित्रपटात काही अवघड अॅक्शन दृश्ये करावी लागली. त्यासाठी तिने व्यायामशाळेत कसून सरावदेखील केला.
