Delhi Red Fort Blast Marathi Artist Post : देशाची राजधानी दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळील परिसरात एका कारमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांच्या आसपास ही घटना घडली. ह्युंदाई I-20 कारमध्ये हा स्फोट झाला. या दुर्घटनेत एकूण नऊ जणांचा मृत्यू; तर २२ हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेतील जखमींना जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दिल्लीमधील या दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. तसेच बॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनीसुद्धा त्याबद्दल दु:ख व्यक्त करीत पोस्ट शेअर केल्या आहेत. गायिका केतकी माटेगांवकर, सलील कुलकर्णी व अभिनेता पुष्कर जोग या मराठी कलाकारांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर, सोनू सूद, रवीना टंडन, रिद्धिमा कपूर या बॉलीवूड कलाकारांनीही स्फोटाच्या घटनेबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत.
मराठी संगीतकार सलील कुलकर्णीनं दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील झालेल्या स्फोटाच्या घटनेचं वृत्त शेअर करीत “खूपच दुःखद” म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. केतकीनं म्हटलंय, “दिल्लीमधील सर्व नागरिकांनो… सुरक्षित राहा. माझ्या प्रार्थनांमधून मी तुमच्याबरोबर आहे.” तर अभिनेता पुष्कर जोग याने याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अभिनेता पोस्ट शेअर करीत म्हणतो, “दिल्लीतील या स्फोटात ज्या लोकांनी आपले प्राण गमावले त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना. जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना करतो आहे. त्यात पुन्हा जर पाकिस्तानचा सहभाग असेल, तर…? BCCI, खेळा अजून सामने… खेळ आणि राजकारण वेगळे आहेत, नाही का? या घटनेत आपला प्राण गमावलेल्यांची जबाबदारी कोण घेणार?”

रवीना यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर करीत म्हटलंय, “दिल्लीतील स्फोटात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना. ही खूपच भीषण दुर्घटना आहे.: सोनू सुदने ट्विटद्वारे म्हटलं, “दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात जखमी आणि निधन झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.” यापुढे त्यानं आवाहन करीत “चला जखमींना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊ आणि शांततेसाठी प्रयत्न करू”, असं म्हटलंय.
नेहा शर्मानंही याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि असं म्हटलं आहे की, “दिल्लीतील या स्फोटाच्या घटनेमुळे मला खूपच धक्का बसला आहे आणि अत्यंत दुःख वाटत आहे. ज्या कुटुंबीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते. तसेच जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना आहे की, ते लवकर यातून बरे व्हावेत.”

तसेच रिद्धिमा कपूरनंही पोस्टद्वारे म्हटलं, “दिल्लीतील स्फोटात ज्यांनी आपले जीव गमावले त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी, तसेच जखमी झालेल्यांसाठी माझ्या प्रार्थना. लाल किल्ल्याजवळची स्फोटाची घटना खूपच दुःखद आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच अपेक्षा.”
