संगीतकार देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेली ‘ही चाल तुरुतुरू, उडती केस भुरुभुरू’ किंवा ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. कोणत्याही मराठी वाद्यवृंदात किंवा गाण्यांच्या भेंडय़ांमध्ये आजही ही दोन गाणी म्हटली जातातच. ‘आक्रंदन’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या संगीताची जादू घेऊन देवदत्त साबळे रसिकांपुढे येणार आहेत. दिवंगत कवी-गीतकार सुधीर मोघे यांनी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत.
चित्रपटातील ‘देव जेवला आम्ही पाहिला’ हे आदिवासी गाणे स्वत: देवदत्त साबळे यांन गायले आहे. तर ‘दाद मी मागू कुठं, गाऱ्हाणं नेऊ कुठं’ हे गाणे सुरेश वाडकर यांनी गायले आहे. पार्वती ध्रुव प्रॉडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांनी के ले आहे.
दिवंगत गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या गाण्यांना साबळे यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात उपेंद्र लिमये, शरद पोंक्षे, बाळ धुरी, विक्रम गोखले, स्मिता तळवलकर, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर आदी कलाकार आहेत.