Ranveer Allahbadia Comment Controversy : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील त्याच्या वक्तव्यामुळे तो चांगलाच अडचणीत आला आहे. त्यानं केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चहुबाजूंनी त्याच्यावर टीका केली जात आहे. मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनीही त्याच्या वक्तव्यावरून टीका केली आहे. या प्रकरणी आता प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यानंही प्रतिक्रिया दिली आहे.

ध्रुव राठीने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यानं अशा पद्धतीची अश्लील वक्तव्ये करण्यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच हे पूर्णत: चुकीचं असल्याचे म्हटलं आहे. “मी नेहमीच शिवीगाळ आणि अश्लील भाषेच्या विरोधात आहे. मी बनवलेल्या १००० हून अधिक व्हिडीओ, शॉर्ट्स व रील्समध्ये तुम्हाला कोणासाठीही अपशब्द दिसणार नाही. ‘डंक कॉमेडी’च्या नावाखाली आज जे काही चाललं आहे, ते पूर्णत: चुकीचं आहे.”

अशा विषयांमुळे तरुणांच्या बौद्धिक विकासावर परिणाम होत असल्याचं म्हणत ध्रुवनं पुढे सांगितलं, “प्रेक्षकांना धक्का बसेल किंवा वाईट वाटेल असं काहीतरी करणं, हा अशा व्हिडीओंचा एकमेव उद्देश असतो. त्यामुळे आपल्या तरुणांच्या नैतिक आणि बौद्धिक विकासावर घातक परिणाम होतो.”

सोशल मीडियावर सतत काही ना काही माहिती समोर येत असते. विविध कंटेन्ट क्रिएटर माहितीचा भडिमार करीत असतात. त्यामध्ये अशा पद्धतीची वक्तव्यं असलेल्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. असे घडू नये यासाठी काय केलं पाहिजे यावरही ध्रुवनं मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, “अशा माहितीवर सरकारी बंदीची मागणी करणं हा काही ठोस उपाय नाही. त्याव्यतिरिक्त येथे कठोर सेन्सॉरशिप व्यवस्था लागू केली जाऊ शकते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तसेच अशी माहिती समोर येऊ नये म्हणून कंटेन्ट क्रिएटर्सवर आणखी चांगला कन्टेन्ट बनवण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे”, असे सांगून, ध्रुवने पुढे बॉलीवूडच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाशी या घटनेची तुलना केली. तो म्हणाला, “‘इंडियाज गॉट लेटेंट’सारख्या शोमुळे समाजातील व्यक्तींच्या नैतिकतेवर ‘अॅनिमल’ चित्रपटासारखा प्रभाव पडतो, हे त्यांना कठोर शब्दांत सांगण्याची गरज आहे.”