२३ डिसेंबरला प्रदर्शित झालेला ‘दंगल’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या जीवनावर बेतलेल्या ‘दंगल’ या चित्रपटाने विक्रमी कमाई करत सर्वच चित्रपटांना पिछाडले आहे. असे असले तरीही गीता-बबिताच्या प्रशिक्षकांनी मात्र या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका मलिन करुन दाखविण्यात अल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशिक्षक प्यारा राम सोंधी यांच्या मते, “महावीर फोगट सज्जन व्यक्ती असल्याचे सगळ्यांनाच माहित आहे. त्यांनी कधीच आमच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मुलींच्या सामन्यांवेळी ते अनेकवेळा नसायचेच. ‘दंगल’ पाहून आल्यानंतर माझ्या एका शिष्याने विचारलं की, २०१० कॉमनवेल्थ गेम्समध्ये तुम्हीच प्रशिक्षक होता ना?. मी त्यावर हो म्हणालो. पुढे त्याने विचारले की, अंतिम सामन्याच्यावेळी तुम्ही गीताच्या वडिलांना खरंच एका खोलीत डांबले होते का? ही माझ्यासाठी आश्चर्यकारक बाब होती, कारण असे काहीच घडले नव्हते. चित्रपटामध्ये त्यांनी माझ्या नावाऐवजी पी. आर. कदम अशा नावाच्या प्रशिक्षकाचा आशय देत माझी व्यक्तिरेखा दाखवली आहे. पण, त्याचा माझ्या जीवनाशी थेट संपर्क नसल्याचेच दिसत आहे’, असे म्हटले होते.

एएनआयच्या वृत्तानुसार गीता- बबिताच्या प्रशिक्षकांनी केलेल्या या आरोपांवर आपली भूमिका मांडताना आमिर म्हणाला की, ‘प्रत्येक चरित्रपटामध्ये काही काल्पनिक दृश्ये पाहायला मिळतातच. या चित्रपटाला प्रेक्षकांनी आपलेसे केले आहे. प्रत्येकजण चित्रपटाच्या कथेमध्ये स्वत:चा शोध घेत आहे. प्रेक्षकांचा ‘दंगल’ला मिळणारा प्रतिसाद खरंच खूप आनंददायी आणि दिलासा देणारी बाब आहे’.

वाचा: BLOG : म्हणून बॉक्स ऑफिस वर ‘दंगल’ची दंगल

चित्रपटाबद्दल आणखीन माहिती देताना आमिर म्हणाला की, ‘हा चित्रपट साकारताना त्यातील काही कलात्मक बाबींवर चर्चा होत असताना आम्हीही त्या चर्चेचा भाग होतो. प्रेक्षक ज्या दृष्टीकोनाने चित्रपट पाहतात, त्यापेक्षा काहीशा वेगळ्या दृष्टीकोनाने आम्ही चित्रपटाकडे पाहतो. त्यामुळे या चित्रपटाचा प्रेक्षकांवर काय परिणाम होईल याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आम्ही १०० वेळा हा चित्रपट पाहूनही प्रेक्षकांवर या चित्रपटाचा जो काही परिणाम झाला आहे, अगदी तसेच आमच्यासोबत झालेले नाही’. आमिरच्या या वक्तव्यावरुन त्याने अप्रत्यक्षपणे गीता-बबिताच्या प्रशिक्षकांच्या आरोपांना फेटाळले आहे, असेच म्हटले जात आहे.