प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट हे एकीकडे लेखक म्हणून आपल्या पत्नीची कथा ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटातून मांडताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे याच विषयाशी संबंधित मालिके चे लेखनही त्यांनी केले असून ‘दिल की बातें दिल ही जाने’ या सोनी वाहिनीवरील नवीन मालिकेच्या निमित्ताने महेश भट्ट छोटय़ा पडद्यावरही सक्रिय झाले आहेत. गुरुदेव भल्ला आणि धवल गाडा निर्मित ‘दिल की बातें’ हा अनोखा शो सोनी टीव्हीवर रुजू झाला आहे.
मालिकेची क थाकल्पना महेश भट्ट यांची आहे. मरणाच्या दारात असलेल्या आपल्या पत्नीला वाचवण्याकरिता स्वत:ची स्वप्ने, इच्छा-आकांक्षा पणाला लावणाऱ्या रामची ही कथा आहे. ‘आत्तापर्यंत मी लिहिलेले हे उत्तम आत्मचरित्र असेल. या मालिकेची कथा म्हणजे माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावरचा प्रवास आहे. अशाच मोठय़ा संकटातून मीही जात होतो आणि त्यावेळी माझ्या आयुष्यात यू. जी. कृष्णमूर्ती आले. त्यांचे विचार, त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यातून आमचे घडत गेलेले एक वेगळ्या प्रकारचे नाते हे या मालिकेच्या कथानकाच्या मुळाशी आहे’, असे महेश भट्ट यांनी सांगितले. कथा महेश भट्ट यांच्या १९८९ साली प्रदर्शित ‘डॅडी’ या चित्रपटाशी साधम्र्य असणारी आहे, असे सांगितले जाते.
अभिनेता राम कपूर या मालिकेच्या केंद्रस्थानी असून त्याच्या आजारी पत्नीची भूमिका अभिनेत्री गुरुदीप कोहली हिने साकारली आहे. माझी कथा निर्माता गुरुदेव भल्ला यांनी उचलून धरली आणि ही मालिका साकारली, असे सांगणाऱ्या महेश भट्ट यांनी मालिकेत मुख्य भूमिकेसाठी आपण राम कपूरचाच विचार केला होता, असे सांगितले. रामला मी माझ्या मुलीच्या पहिल्याच चित्रपटात ‘स्टुडंट ऑफ द इअर’मध्ये पाहिले होते. त्याच्या कामाने मी भारावून गेलो होतो. या मालिकेत रामच ही व्यक्तिरेखा उचलून धरेल, असा विश्वास महेश भट्ट यांनी व्यक्त केला. प्रेक्षकांवर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तिरेखा आणि तशा कथा देण्यावर सोनीचा नेहमीच भर राहिला आहे. ‘दिल की बातें’ ही महेश भट्ट यांनी लिहिलेली उत्कट प्रेमकथा आहे. केवळ प्रेम नाही तर समाजात अशा काही मूलभूत समस्यांना लोकांना सामोरे जावे लागते, हेही यातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे सोनी एंटरटेन्मेंटचे मार्केटिंग प्रमुख गौरव सेठ यांनी सांगितले. ‘दिल की बातें’ हा शो सोनी टीव्हीवर सोमवार ते गुरुवार रोज रात्री साडेनऊ वाजता दाखवला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dil ki baatein on sony television
First published on: 25-03-2015 at 07:58 IST