‘ससुराल सिमर का’फेम अभिनेत्री दीपिका कक्कर टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका आहे. सध्या दीपिका तिच्या लिव्हर कॅन्सरच्या सर्जरीमुळे चर्चेत आहे. जूनमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. अभिनेत्रीचा पती शोएब सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून तिच्या हेल्थिविषयी अपडेट देत असतो.

दीपिकाच्या एका ब्लॉगमध्ये तिचा पती, अभिनेता शोएब इब्राहिमने सांगितले होते की, ट्यूमर पुन्हा होण्याचा धोका जास्त असतो, म्हणूनच डॉक्टरांनी एक वर्षापेक्षा जास्त काळ उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या महिन्यात दीपिकाने टार्गेटेड थेरपी सुरू केली आणि तिचा पहिला महिना पूर्ण होताच, अभिनेत्रीने सांगितले की तिचे केस गळत आहेत आणि शरीरावर लाल चट्टे उठले आहेत.

तिच्या नवीनतम ब्लॉगमध्ये, दीपिकाने तिच्या आरोग्याची अपडेट शेअर केली आणि म्हणाली, “टार्गेटेड थेरपीसाठी गोळ्या घेत एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे, म्हणून आम्हाला फॉलो-अपसाठी डॉक्टरकडे जावे लागत आहे. आम्ही काही रक्त चाचण्या आणि ईसीजी केले आहेत. मला थोडी चिंता वाटत आहे. आता जेव्हा जेव्हा मी डॉक्टरांना भेटायला जाते तेव्हा मला असेच वाटते. कदाचित पुढच्या महिन्यात जेव्हा आम्ही माझे स्कॅन आणि ट्यूमर मार्कर चाचणी पुन्हा करू तेव्हा हे वाढेल.”

डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर दीपिका कक्कर पुढे म्हणाली, “मी माझी चिंता डॉक्टरांबरोबर शेअर केली. माझ्या ईएनटी समस्या, अल्सर आणि तळहातावर लाल चट्टे हे सर्व मी टार्गेटेड थेरपीसाठी घेत असलेल्या औषधाचे दुष्परिणाम आहेत. जर जळजळ जास्त झाली तर हे दुष्परिणाम बरे करण्यासाठी मला औषधे देण्यात आली आहेत. टॅब्लेटमुळे माझे केस गळत आहेत. हा दुष्परिणाम फक्त १० टक्के लोकांमध्ये होतो आणि मी त्यापैकी एक आहे. पण, मला तक्रार करण्यासारखे काहीही नाही, कारण औषध का घेतले जात आहे हे जास्त महत्त्वाचे आहे.”

दीपिका पुढे म्हणाली, “मी प्रार्थना करते की हे औषध चांगले काम करेल. सुदैवाने माझे ब्लड रिपोर्ट्स आणि ईसीजी नॉर्मल आले आहेत. माझे शरीर टॅब्लेट चांगल्या प्रकारे स्वीकारत आहे. फक्त हे किरकोळ दुष्परिणाम आहेत. पुढच्या महिन्यात माझ्या शस्त्रक्रियेला तीन महिने होतील आणि माझे पहिले स्कॅन होईल. कृपया सर्व काही ठीक व्हावे अशी प्रार्थना करा, मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.” कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर दीपिका कक्कर शेवटची ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये दिसली होती, पण आरोग्याच्या कारणास्तव तिला शो मध्येच सोडावा लागला होता.