scorecardresearch

Premium

स्मृतिरंजनातून विचारांशी जोडून घेणारा आत्मपॅम्फ्लेट

एक चांगला विषय नेहमीपेक्षा वेगळय़ा चित्रपटीय शैलीत मांडण्याचा प्रयत्न लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशीष बेंडे यांनी ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटातून केला आहे.

atmapamplet movie

नव्वदच्या दशकातील शाळकरी मुलं, त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टी यांचा संदर्भ घेत त्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगला विषय नेहमीपेक्षा वेगळय़ा चित्रपटीय शैलीत मांडण्याचा प्रयत्न लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशीष बेंडे यांनी ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटातून केला आहे. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाच्या निमित्ताने या लेखक-दिग्दर्शकद्वयीने ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देत विविध विषयांवर मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी हे लेखकाच्या भूमिकेतून, तर त्यांच्याबरोबर पहिल्या चित्रपटापासून साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले आशीष बेंडे हे दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या दोघांच्या एकत्रित येण्यातून ‘आत्मपॅम्फ्लेट’ कसा आकाराला आला याबद्दल बोलताना परेश मोकाशी यांनी त्याचे बीज त्यांच्या मैत्रीच्या नात्यात असल्याचे सांगितले. ‘आम्ही खूप प्राचीन काळापासून मित्र आहोत. त्याच्या बालपणीच्या, युवा अवस्थेच्या करामती माझ्या कानावर होत्या. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या माझ्या पहिल्या चित्रपटापासून माझ्याबरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून तो काम करत होता. तेव्हा कधी तरी त्याला स्वतंत्र चित्रपट करायला द्यायचं हे डोक्यात होतं; पण काही जुळून येत नव्हतं. माझी पत्नी मधुगंधाने सुचवलं, एरव्ही तुम्ही दोघं एकमेकांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची देवाणघेवाण करत असता. त्यातूनच काही कथा मिळतेय का पाहा.. आशीषने मग काही पानं लिहून आणली की हे आजवरचं माझं आयुष्य. मग माझा चित्रपटाबद्दलचा विचार सुरू झाला,’ असं परेश यांनी सांगितलं.

nitin gadkri biopic
नितीन गडकरींचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहता येणार; चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर, प्रदर्शनाची तारीखही ठरली
the vaccine war
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ला सर्वत्र थंड प्रतिसाद, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी निर्मात्यांनी दिली ‘ही’ लहास ऑफर
ashutosh-gowariker-biopic
आशुतोष गोवारीकर सादर करणार भारतातील ‘या’ उत्तुंग व्यक्तिमत्त्वावरील बायोपिक; पोस्टरसह केली चित्रपटाची घोषणा
vivek-agnihotri-the-vaccine-war
‘द व्हॅक्सिन वॉर’बद्दल चित्रपटसृष्टीने बाळगलंय मौन; विवेक अग्निहोत्री यांचं वक्तव्य चर्चेत

.. म्हणजे चित्रपट नव्हे

‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाच्या मांडणीसाठी एका वेगळय़ा शैलीचा विचार केला गेला, अशी माहिती परेश यांनी दिली. त्यामागचं कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘बऱ्याचदा तुमच्या डोळय़ासमोर चांगल्या घटना किंवा कल्पना असतात; पण त्याचा चित्रपट तुम्हाला सुचत नाही. केवळ कथेच्या अनुषंगाने कॅमेऱ्याने चित्रित करणं म्हणजे चित्रपट नव्हे, तर चित्रपट म्हणून त्यात काही विशेष असायला, सुचायला पाहिजे. त्यामुळे आशीषने त्याची कथा लिहून आणल्यानंतर खूप दिवस ती तशीच पडून होती. ही कथा कशा पद्धतीने मांडता येईल याची एक शैली मला सुचली आणि मग कोणी तरी अत्यंत सामान्य माणसाची गोष्ट रंजकपणे सांगतं आहे अशा पद्धतीने निवेदनाच्या शैलीची जोड, अतिशयोक्ती आणि तिरकसपणा अशा चित्रपटीय गोष्टींचे प्रयोग त्यात करता आले आणि त्यातून ‘आत्मपॅम्फ्लेट’ साकारला.’ 

कुठल्या एका काळात अडकलेली गोष्ट नाही

नव्वदच्या दशकातील एका मुलाचं चरित्र असं चित्रपटाचं स्वरूप असल्याने त्या काळाच्या स्मृती जागवण्यासाठी म्हणून बर्फाचा गोळा, ‘आशिकी’ची गाणी असे घटक चित्रपटात आहेत; पण माझ्या मते सिनेमाचा विषय आजच्या पिढीलाही आवडेल असाच आहे, असे दिग्दर्शक आशीष बेंडे यांनी स्पष्ट केले. या चित्रपटाला ऑस्ट्रेलियात झालेल्या एशिया पॅसिफिक स्क्रीन अ‍ॅवॉर्डस सोहळय़ात सर्वोत्कृष्ट युवा चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, अशी माहिती देताना ७० देशांतून निवडलेल्या तीन चित्रपटांमध्ये ‘आत्मपॅम्फ्लेट’चा समावेश होता, असं त्यांनी सांगितलं. ‘तेथील मीडिया स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहून परीक्षण केलं, व्हिडीओ कॉलवर चर्चा केली आणि त्यातून मग या पुरस्कारासाठी ‘आत्मपॅम्फ्लेट’ची निवड झाली. हा चित्रपटाला मिळालेला पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता. तिथल्या मुलांचा आपल्याकडच्या आठवणींशीच नाही तर आत्ताच्या घडामोडींशीही काही संबंध नाही. तरीही त्यांना हा चित्रपट समजला. त्यामुळे चित्रपटात आजच्या काळातील घटनांचा संदर्भ नसला तरी त्यातला विषय जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी आजही ज्वलंत आहे आणि पुढेही काही काळ राहील,’ असं आशीष यांनी सांगितलं. 

‘दिग्दर्शनाची एकच एक शैली असू नये’

दिग्दर्शकाची एकच एक शैली असू नये हे मी परेश यांच्याकडून शिकलो, असे सांगताना पुण्यात पत्रकारितेचं शिक्षण सोडून मुंबईत अभियन-दिग्दर्शन क्षेत्रातील प्रवास परेश मोकाशी यांच्यामुळे कसा शक्य झाला याची आठवणही आशीष यांनी सांगितली. ‘मला अभिनयात फार रस नव्हता, पहिल्यापासूनच दिग्दर्शन करायची इच्छा होती. एकांकिकेत काम करशील का? असं विचारत परेश यांनी मुंबईला बोलावलं. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ ते आत्ताच्या ‘वाळवी’पर्यंत मी त्यांच्याबरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. परेश यांनी प्रत्येक चित्रपटागणिक आपली शैली बदलली. एकच एक शैली न ठेवता वेगवेगळय़ा गोष्टी शोधत राहा, हे मी त्यांच्याकडून शिकलो, असे आशीष यांनी सांगितले.

‘हिंदीचं अंधानुकरण’

आपल्याकडे सिनेमा बनवताना हिंदीचं अंधानुकरण केलं जातं. अ‍ॅक्शन, मारामारी, चॉपरमधून येतानाचे शॉट्स असं काय काय म्हणजे थोडक्यात चकचकीत गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र हे सगळं मराठी प्रेक्षकांना हिंदीतही पाहायला मिळतं. सलमान-आमिरच्या चित्रपटात तो चकचकीतपणा आणण्यासाठी ७०-८० कोटी रुपये मोजले जातात. इतका पैसा ओतून ते वलयांकित रंजक चित्रपट देण्याचा प्रयत्न करतात, आपण तेच २-३ कोटी रुपयांमध्ये करायला जातो. त्यापेक्षा आपली ताकद ही उत्तम संहितेत आहे हे ओळखून त्यावर काम केलं आणि एक चांगला चित्रपट दिला तर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो, असं मत आशीष यांनी व्यक्त केलं. 

‘या क्षेत्राच्या वलयाला भुलू नका’

चित्रपट क्षेत्रातील वलयाला भुलून येऊ नका, असा आग्रही सल्ला परेश मोकाशी यांनी दिला. ‘ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं आहे, त्यात तुम्हाला गती आहे का हे तपासा. बऱ्याच वेळा असं होतं, मनात कल्पना मोठमोठय़ा असतात; पण प्रत्यक्षात आपण त्यात उतरतो तेव्हा आपल्याला प्रतिसाद मिळत नाही, कामं मिळत नाहीत, अर्थार्जन होत नाही आणि मग नैराश्य येतं’ हे सांगताना सध्या प्रत्येकाला घरच्या घरी आपल्याला या क्षेत्रात खरोखर गती आहे का हे तपासणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘हल्ली प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये कॅमेरा आहे, तुम्ही तुमच्या १५ मिनिटांच्या फिल्म्स करा, लॅपटॉपवरही हल्ली संकलन करता येतं. तुम्ही ते करून पाहा, तुम्हाला ते जमतंय का हे तुम्हालाच लक्षात येईल. फक्त हे क्षेत्र खूप भव्यदिव्य आहे आणि म्हणून मला इथे यायचं आहे असं करून उपयोग नाही,’ असंही परेश मोकाशी यांनी स्पष्ट केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Directed by ashish bende a atmapamphlet movie that engages thoughts through reminiscence ysh

First published on: 01-10-2023 at 02:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×