शिवसेना आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव अनेकदा बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीसोबत जोडलं गेलं आहे. हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असून अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुलाखतींमध्येही अनेकदा या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले गेले आहेत. ‘न्यूज १८’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिशाने पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे तुझ्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्या कामावर किती विश्वास आहे असा प्रश्न दिशाला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या कामावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्टी आहे.”
आदित्य यांच्या कामाची स्तुती करत ती पुढे म्हणाली, “ते पर्यावरण संवर्धनासाठी बरंच काही करत आहेत. खास करून जंगल वाचवण्यासाठी त्यांनी चांगले पाऊल उचलले आहे. आता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे. त्यांनी मुंबईच्या नाइट लाइफला चालना दिली आहे. आता तुम्ही रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरु शकता, सिनेमा पाहू शकता. नाइट लाइफच्या संकल्पनेवर त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे.”