पाठ्यपुस्तकातील धाडसी हिरकणीची कथा आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर नुकतंच एका अभिनेत्रीने प्रसादसोबतचा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोतील चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का? ही अभिनेत्री मिताली मयेकर व अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची होणारी पत्नी आहे.
‘हिरकणी’निमित्त मितालीने हा लहानपणीचा फोटो शेअर करत त्यासोबत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ”मी लहान असताना घरकूल ही मालिका न चुकता पाहायचे. या मालिकेची खूप मोठी चाहती होती. त्यातील एक अभिनेता मला प्रचंड आवडायचा. हाच तो अभिनेता आहे, ज्याच्यासोबत माझा हा फोटो आहे. सेलिब्रिटीसोबत फोटो काढण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. खूप हिंमत करून मी त्या अभिनेत्याजवळ गेले आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. त्यावेळी जरासुद्धा विचार केला नव्हता की दोन दशकांनंतर त्याच अभिनेत्यासोबत माझी चांगली मैत्री होईल आणि त्याच्यासोबत चांगला वेळ घालवेन. आज जरी मी त्याची मैत्रीण असले तरी सर्वांत आधी त्याची चाहती आहे. प्रसाद दादा शिवराज्याभिषेक गाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुझ्या हिरकणी या चित्रपटाची मी आतुरतेने वाट पाहत आहे,” अशा शब्दांत मितालीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
https://www.instagram.com/p/B3Bl–Sphor/
पाहा फोटो : मितालीच्या आयुष्यातील ‘जिवलगा’
याच वर्षाच्या सुरुवातीला मिताली व सिद्धार्थ यांचा साखरपुडा पार पडला. ‘उर्फी’ चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं आहे. तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ सारखे अनेक चित्रपट ‘अग्नीहोत्र’, ‘प्रेम हे’ सारख्या मालिकेतून सिद्धार्थनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थनं इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.