रवींद्र पाथरे
मराठी साहित्यात ग्रामीण भागाचं, तिथल्या माणसांचं, संस्कृतीचं, तिथल्या लोकव्यवहाराचं, लोकसंचिताचं चित्रण अनेक लेखकांनी केलेलं आहे. आज तर बहुतांश ग्रामीण लेखक आणि वाचकच मराठी साहित्याचे वाहक झालेले दिसतात. परंतु मराठी रंगभूमीवर मात्र लोकनाट्यं, तमाशा आदी लोककलाप्रकार वगळता मुख्य धारेत ग्रामीण लोकजीवन आणि तिथली संस्कृती चित्रित होताना अभावानंच आढळते. याचं मुख्य कारण व्यावसायिक रंगभूमीचे प्रेक्षक हेच असावं. कारण ते आजवर बहुतांशी शहरी मध्यमवर्र्गीयच राहिलेले आहेत. मुख्य धारा रंगभूमीचा तो जणू नेहमी कणाच राहिलेला आहे. म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवरील कलाकार जरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेले असले तरी त्यांना याच साच्यातल्या, याच पठडीतल्या नाटकांतून कामं करावी लागतात ही वस्तुस्थिती आहे. मोजक्याच नाटकांतून अधूनमधून एखादी व्यक्तिरेखा ग्रामीण पार्श्वभूमीची असली तरी तो अपवाद करता नाटक शहरी मध्यमवर्र्गीय प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवूनच बेतलेलं असतं. त्यांची सुखदु:खं, त्यांचं जगणं, त्यांचे मनोव्यापार, त्यांचं रंजन हेच या नाटकांच्या केन्द्रस्थानी असतं. याचा अर्थ ग्रामीण बाजाची, पार्श्वभूमीची नाटकं इथे झालीच नाहीत असं नाही. ‘शितू’, ‘चाकरमानी’, ‘वस्त्रहरण’, ‘येवा कोकण आपलाच आसा’, ‘गारंबीचा बापू’, ‘बॅरिस्टर’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘गुंतता हृदय हे’ अशी नाटकंही या रंगभूमीवर आली आणि गाजलीदेखील. पण त्यांचं प्रमाण फार कमी. अलीकडच्या काळात तर अशी नाटकं दुर्मीळच झालीयत. या पार्श्वभूमीवर ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ हे प्रदीप आडगावकर निवेदित आणि पुरुषोत्तम बेर्डे निर्मित, रंगावृत्तीत, दिग्दर्शित, नेपथ्यित, प्रकाशयोजित, संगीतीत, वेशभूषित (सब कुछ!) नाटक रंगभूमीवर येणं हा सुखद धक्काच म्हणायला हवा. यानिमित्तानं ग्रामीण संस्कृतीच्या गतरम्यतेत काही काळ जाता आलं. ती काही क्षण का होईना, अनुभवता आली. काळाच्या पटावर वेगानं दृष्टिआड होणारं हे विश्व त्या काळात जात पुनश्च जगता आलं.

मराठवाड्यातील भोकरदन तालुक्यातील आडगाव या गावातील प्रदीप आडगावकर हे आपल्या व्यवसायानिमित्त जग फिरलेले गृहस्थ काही काळानंतर गावच्या ओढीनं आपल्या मुळांकडे परत येतात. ज्या गावानं आपल्याला घडवलं, तिथल्या ग्रामसंस्कृतीचे गतरम्य उमाळे येऊन आपल्या या गावातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारावं, त्यांनी आधुनिक शेतीचं तंत्र शास्त्रीयरीत्या अंगीकारून मार्गी लागावं म्हणून ते भोवतालच्या चार हजार शेतकऱ्यांना घेऊन गटशेतीचा यशस्वी प्रयोग करतात आणि गावात एक नवचैतन्याची लाट आणतात, त्याची ही कथा! खरं तर या शेतीच्या प्रयोगाबद्दल फारच त्रोटक माहिती या नाटकात दिली गेली आहे. नाटकाचा सगळा भर आहे तो पूर्वीच्या ग्रामसंस्कृतीची गतरम्यता (नॉस्टेल्जिया) दाखवण्याचा. १९७५-८० चा तो काळ. आपल्या शेतवावरात काबाडकष्ट करून पिकेल त्या धान्यावर गुजराण करणारं हे आडगाव.

हेही वाचा >>>‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

प्रत्येक गावाची असते तशी या गावालादेखील आपली एक संस्कृती आहे. कुळाचार आहेत. यात्रा-जत्रा आहेत. हळूहळू गावात आधुनिकतेचं वारं शिरू लागलंय. पण तरीही माणसं एकमेकांना धरून आहेत. गावातील एका तालेवार घराण्यात लेखकाचा जन्म झालाय. त्यांची आई या गावाचं, इथल्या आसमंताचं हित चिंतणारी… सर्वांच्या अडीअडचणींना धावून जाणारी. गावात हिंदू-मुसलमान हा भेद कधीच न जाणवणारा. गावातलं वजनदार कुटुंब असलेल्या लेखकाच्या घरात शेतवावराचं मोठं खटलं. साहजिकच गडीमाणसं, पाहुणेरावळे, गाववाले आणि आल्या-गेल्याच्या अडचणी निवारण्यात त्यांची माऊली सदा धन्यता मानते. अशा गुण्यागोविंदाने नांदण्याच्या, भजन-कीर्तन-प्रवचनाच्या घट्टमुट्ट वातावरणात वाढलेल्या लेखकाचा पिंड या गावच्या मातीतच रुजलेला. फोफावलेला. संस्कारित झालेला. गावातली देवळं, यात्रा-जत्रेतली धमाल, तिथला तमाशा, टुरिंग टॉकीज, तिथली दुकानं, लोकांचा तिथला बेहोष वावर यांचे पूर्वसंस्कार त्याच्यावर खोलवर झालेले. त्या आठवणी जगाच्या पाठीवर कुठंही तो गेला तरी सतत पाठलाग करत राहिलेल्या.

एका अपघाती प्रसंगानं लेखकाच्या त्या आठवणी वर उफाळून येतात. त्या सांगत असताना तो काळ, ती माणसं, तो परिसर त्याच्या डोळ्यांसमोर लख्ख उभा राहतो. त्याचंच हे नाट्यरूप.

दोन भुरट्या चोरांना आपलं गाव दाखवण्याच्या मिषानं तो गावात आणतो. या प्रवासात तिथल्या आठवणींचे उमाळे त्याला सद्गदित करत राहतात. त्यात त्याच्या बालपणीच्या किस्सेवजा आठवणी जाग्या होतात. तिथली अनघड माणसं, त्यांचे राग-लोभ, हर्ष-खेद, त्यांच्या वागण्या-वावरण्यातले कंगोरे, काळ बदलत गेला तसतसा त्यांच्यात पडत गेलेला फरक, त्यांच्या गरिबीतलीही मनाची श्रीमंती… या सगळ्याचं दर्शन त्यातून होतं. पन्नास-साठ वर्षांपूर्वीचं अवघं ग्रामजीवन त्या आठवणींतून उभं राहतं. इतका दीर्घ पट नाटकातून उभा करायचा तर त्यात कथनाचं आयुध आलंच. ते प्रदीप आडगावकरांनी लीलया पेललं आहे. बोलण्या बोलण्यात साक्षात उभे राहणारे प्रसंग उभे करण्यातली त्यांची हातोटी लाजवाब. पुरुषोत्तम बेर्डे यांनी हे शिवधनुष्य तितक्याच ताकदीनं पेललं आहे. सर्वार्थानं. रंगवलेले पडदे, फ्लेक्स, संगीताची साधनं, हरहुन्नरी पंचवीस कलाकार मंडळी यांच्या साहाय्याने त्यांनी हा गतरम्यतेचा सोहळा समर्थपणे साकार केलाय. गंमत म्हणजे यात कुठंही अतिशयोक्ती वा उगा काटकसर नाही. उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर त्यांनी केला आहे. सांकेतिक, सूचक नेपथ्य, मोजकीच प्रॉपर्र्टी, चपखल वेशभूषा, प्रसंगरेखाटनातला लोककलेचा लवचीक बाज आणि शिस्तबद्ध, जीव ओतून काम करणारी चतुरस्रा कलाकार मंडळी यांच्या जीवावर त्यांनी हे ग्रामजीवन चितारलं आहे. क्वचित निवेदनात कधीतरी अघळपघळपणा होतो, तितकाच. पण त्याने मूळ वास्तूला धक्का लागत नाही. शहरी प्रेक्षकालाही धरून ठेवेल असं हे ग्रामचित्र आहे… त्याला आपल्या भूतकाळात नेणारं! पठ्ठे बापूराव, ज्ञानोबा उत्पात, प्रा. गणेश चंदनशिवे, प्रमोदिनी जेहुरकर आणि प्रदीप आडगावकर यांच्या रचनांचा समर्पक वापर, पुरुषोत्तम बेर्डे यांचं प्रवाही संगीत, उदय तागडी यांची प्रसंगानुरूप रंगभूषा आणि ‘सब कुछ’ पुरू बेर्डे यांचं हे समीकरण उत्तम जुळून आलंय. त्याला प्रदीप आडगावकर यांच्या रोचक आत्मनिवेदनाची आणि सादरीकरणाची छान साथ मिळालीय. विविध नाट्यशास्त्र विभागांतील ताज्या दमाच्या होतकरू कलावंतांची जिद्दीची जोड या प्रयोगाला लाभलीय. निकिता जेहुरकर, श्रुती गिरम, प्रतिभा गायकवाड, वृषाली वाडकर, कृतिका चाळके, चंद्रशेखर भागवत, विशाल राऊत, संतोष पाटील, गोविंद मिरशीवणीकर, परमेश्वर गुट्टे, सिद्धार्थ बावीस्कर, संदेश अहिरे, मयूर साटवलकर, अविनाश कांबळे, सुकृत देव, ओम प्रकाश आणि कान्हा तिवारी या सर्वच कलाकारांनी ही गतकाळाची ग्रामसफर हृदयंगम केलीय, हे नक्की.