मराठी माणुस आणि नाटक या दोन गोष्टींना कोणीही वेगळं करु शकत नाही. मग तो मुंबईमध्ये राहणारा नागरिक असो किंवा अगदी देशाबाहेर राहणारा मराठी माणूस. प्रत्येकालाचा त्या रंगमंचाची ओढ असते. त्या रंगभूमीच्या प्रेमापोटीच काही मराठी हौशी कलाकार सतत नवनवीन प्रयोग करत असतात. आता हेच पाहा ना दुबईस्थित मराठी कलाकारांनी एकत्र येऊन नाटकामध्येच असाच एक अभिनव प्रयोग करण्याचे ठरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबईतील सक्षम निर्मिती ‘ आणि पुण्यातील ‘ श्रींची इच्छा ‘ या संस्थेकडून दुबईस्थित दिग्दर्शिका सुषमा शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आमदार सौभाग्यवती’ या नाटकाचे पुण्यात दोन प्रयोग होणार आहेत. या नाटकात काम करणारे कलाकारही दुबईस्थितच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे गहिरे रंग दाखवणारे आणि राजकारणातील डाव्या आणि उजव्या बाजूंवर अत्यंत प्रखरपणे आसूड ओढण्याचे काम करणारे रा. र बोराडे यांच्या मूळ कादंबरीवर आधारित, श्रीनिवास जोशी लिखित ‘आमदार सौभाग्यवती’ या नाटकात शिल्पा राणे, लक्ष्मी श्रीनाथ, मंदार जोशी, शिशिर पित्रे, अब्बास मोईझ, तुषार कर्णिक, स्वप्नील राजपूरकर, सुषमा शिंदे आणि जितेंद्र आंबेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

२७ जानेवारीला रात्री ९.३० वाजता अण्णाभाऊ साठे रंगमंदिरमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे तर लगेच दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरमध्ये दुसरा प्रयोग होणार आहे.

दुबईस्थित कलाकारांनी बसवलेल्या आणि अभिनय केलेल्या ‘आमदार सौभाग्यवती’ या नाटकाची टीम पहिल्यांदाच भारतात प्रयोग करीत आहे. प्रत्येक ठिकाणचे नाटकाचे प्रेक्षक हे वेगळे असतात पण पुण्यातले प्रेक्षक हे नाटकाबाबत अगदी चोखंदळ असतात असे असूनही या गोष्टीचे दडपण न घेता आमदार सौभाग्यवतीच्या टीमने दोनही प्रयोगांसाठी पुणे शहराची निवड केली.

नाटकाच्या नावावरुन हे राजकीय पार्श्वभूमीवर भाष्य करणारे नाटक असणार हे स्पष्ट होते. ८०- ९० च्या काळातल्या निवडणूकांचे वातावरण यात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांनी ८०- ९० च्या काळातल्या त्या निवडणुकांचा प्रचार अनुभवला नसेल किंवा तो पुन्हा एकदा अनुभवायचा असेल त्यांच्यासाठी आमदार सौभाग्यवती हा चांगला पर्याय आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dubai based marathi artist to perform aamdar saubhagyavati play in pune
First published on: 18-01-2017 at 18:03 IST