Ekta Kapoor Clarification After Government Bans Altt App : केंद्र सरकारने अश्लीलता पसरवणाऱ्या २५ ॲप्सवर बंदी घातली आहे. त्यामध्ये सर्वांत प्रसिद्ध ॲप Ullu, ALTT यांसारख्या नावांचा समावेश आहे. अश्लीलता पसरवणारे ॲप लवकरच गूगल प्ले स्टोअरवरून आणि अॅपल स्टोअरमधून हटवले जाणार आहेत. Ullu, Altt ॲप हटविण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.
या अॅप्सवर बंदी घातल्यानंतर एकता कपूरच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, एकता कपूर कोणत्याही प्रकारे ‘अल्ट बालाजी’शी संबंधित नाही. या निवेदनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, तिने २०२१ मध्ये स्वतःला या अॅपपासून दूर केले होते.
खरे तर, काल प्रसिद्ध झालेल्या काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, Alt हे एकता कपूरच्या कंपनीच्या सब्सिडियरीच्या मालकीचे ॲप आहे. अनेक रिपोर्टसमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, बंदीनंतर एकता कपूरला खूप त्रास सहन करावा लागला आहे. या दाव्यांमध्ये एकता कपूरने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे.
एकता कपूरचे स्पष्टीकरण
एकताने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. “ALTT प्लॅटफॉर्मशी माझा आणि माझ्या आईचा काहीही संबंध आता राहिलेला नाही. आम्ही दोघी जून २०२१ मध्येच ALTT मधून पूर्णपणे बाहेर पडलो आहोत. बालाजी टेलिफिल्म्स ही कंपनी स्वतंत्रपणे काम करीत आहे आणि सरकारच्या बंदी निर्णयाशी त्यांचा काहीही संबंध नाही. जे लोक एकता कपूरचं नाव या प्रकरणात घेत आहेत, त्यांनी कृपया वस्तुस्थिती तपासूनच मत व्यक्त करावं आणि योग्य ती माहिती द्यावी”, असे एकताने निवेदनात म्हटले आहे.
बालाजी टेलिफिल्म्सबद्दल बोलायचे झाले, तर हे प्रॉडक्शन हाऊस १९८४ मध्ये एकता कपूर आणि तिची आई शोभा यांनी स्थापन केले होते. या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिका बनवल्या गेल्या आहेत.
बंदीचे कारण काय?
हे ॲप्स अश्लील व आक्षेपार्ह वेब सीरिज आणि व्हिडीओ कंटेंट दाखवत होते. ते आयटी कायदा २०००, आयटी नियम २०२१ आणि माहिती व प्रसारण कायद्यांचे उल्लंघन करत होते. ॲप्स हटवण्याचा अर्थ असा होतो की, फोनमध्ये तुम्ही ॲप्स इन्स्टॉल करू शकणार नाही. आधीच इन्स्टॉल केलेल्या ॲप्सचं काम हळूहळू थांबेल किंवा ते अपडेट केले जाऊ शकणार नाहीत.