बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने तिच्या आगामी ओके जानू चित्रपटात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पण, ख-या आयुष्यातही ती अभिनेता फरहान अख्तर याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची चर्चा होती. इतकेच नव्हे तर रविवारी श्रद्धाचे वडिल आणि अभिनेता शक्ति कपूर यांनी तिला फरहानच्या फ्लॅटमधून फरफटत घरी नेल्याचे वृत्त फायनॅन्शिअल एक्स्प्रेस, स्पॉटबॉय आणि इतर काही संकेत्थळानी दिले होते. स्पॉटबॉय डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार फरहानच्या शेजा-यांनी हा सर्व प्रकार पाहिला होता. श्रद्धाचे वडिल शक्ती कपूर आणि मावशी पद्मिनी कोल्हापूरे हे फरहानच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात भांडणही झाले. मात्र, तेव्हा श्रद्धा कोणताही वाद न घालता ती तेथून निघून गेली. सगळीकडे याबाबत चर्चा होत असतानाच शक्ती कपूर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यांची बाजू मांडली.
शक्ती कपूर म्हणाले की, ज्या काही चर्चा चालू आहेत त्या सर्व खोट्या आहेत. यात काहीच तथ्य नाही. यावर विश्वास ठेवू नका. याविषयी त्यांची बाजू मांडण्यास सांगितले असता ते म्हणाले की, हे बघा मी गेल्या ३५ वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा भाग आहे. मला माहितीये इथे काय होतं ते. त्यामुळे आम्ही कोणत्याच प्रकारच्या प्रतिक्रिया देत नाही. श्रद्धा आणि फरहानच्या तथाकथित प्रेम प्रकरणाबद्दल मात्र शक्ती यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, शक्ती यांना फरहान अख्तर आवडत नसल्याचे म्हटले जातेय. फरहानला दोन मुले असून त्याने पहिली पत्नी अधुना हिला घटस्फोट दिला आहे. याच कारणामुळे शक्ती यांना फरहान-श्रद्धाचे नाते पटत नसल्याचे कळते. श्रद्धा आणि फरहान हे दोघेही काही दिवसांपूर्वीच अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया यांच्यासोबत डबल डेटवर गेले होते.
दरम्यान, फरहानची बहिण आणि दिग्दर्शक झोया अख्तर ही वेब सिरीजमध्ये पाऊल टाकण्यास सज्ज झाली आहे. यात फरहान अख्तरही काम करणार असल्याचे झोयाचे म्हणणे आहे.