प्रसिद्ध पॉप गायक एनरिके इग्लेसियस ‘सेक्स अॅण्ड लव्ह वर्ल्ड’ टूरचा भाग म्हणून मेक्सिकोमधील तिजुआना येथील एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना कार्यक्रमाच्या ठिकाणी उडत असलेल्या ड्रोनमुळे त्याच्या हाताला दुखापत झाली. कार्यक्रम पाहायला आलेल्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून एनरिकेचा परफॉर्मन्स पाहता यावा आणि कार्यक्रमाची मजा लुटता यावी म्हणून कॅमेरा बसविलेले ड्रोन कार्यक्रमाच्या ठिकाणी हवेत घिरट्या घालत होते. गायक एनरिकेने हवेत उडणारा असाच एक ड्रोन हातात पकडून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला असता ड्रोनच्या पात्यांनी एनरिकेच्या हाताची दोन बोटे कापली गेली. यानंतर एनरिकेने हृदयाचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे बदामाचे चित्र स्वत:च्या रक्ताने टीशर्टवर रेखाटून चाहात्यांप्रती आपले प्रेम व्यक्त केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला कार्यक्रम न चालू ठेवण्याचा सल्ला दिला असतानादेखील एनरिकेने पुढील काही काळ कार्यक्रम सुरूच ठेवला. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी कार्यक्रम संपल्यानंतर या घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली.