आर्थिक मंदीचा फटका सगळ्याच क्षेत्रांत जाणवत असताना केबल डिजिटायझेशनचा निर्णय भारतीय टीव्ही उद्योगाच्या पथ्यावर पडला आहे. डिजिटायझेशन, टीआरपीऐवजी टीव्हीटीचा निर्णय, अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्स क्षेत्रातील प्रगती यामुळे २०१३ मध्ये भारतीय मनोरंजन उद्योगाची उलाढाल ९२० अब्ज रुपये एवढी झाली आहे. मनोरंजन उद्योगाच्या विकासाचा वेग २०१२च्या तुलनेत मंदावला असला, तरी त्यात १२ टक्के वाढ झाल्याचे फिक्की-केपीएमजीच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय मनोरंजन उद्योगाचा आर्थिक लेखाजोखा मांडणाऱ्या ‘फिक्की’च्या वार्षिक परिषदेला बुधवार, १२ मार्चपासून सुरुवात होत आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी फिक्कीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. आर्थिक मंदीचा आणि रुपयाच्या मूल्यात झालेली घसरण याचा फटका जाहिरात क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या क्षेत्रांना बसला असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, त्याच वेळी दुसऱ्या टप्प्यात पूर्ण झालेले डिजिटायझेशन, टीआरपीऐवजी टीव्हीटीवर दिलेला भर आणि तासाला बारा मिनिटांच्या जाहिरातीचा निर्णय यामुळे टीव्ही उद्योगावर चांगले परिणाम झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. प्रादेशिक प्रसारमाध्यमे आणि वाहिन्यांमध्ये झालेली वाढही विकासासाठी पूरक ठरली आहे.
एकीकडे टीव्ही उद्योगाचा वाढता आर्थिक पसारा आणि दुसरीकडे छोटय़ा-मोठय़ा चित्रपटांनी तिकीटबारीवर केलेली विक्रमी कमाई, देशभरात ९० ते ९५ टक्के डिजिटल मल्टिप्लेक्स आणि मोठय़ा शहरांपाठोपाठ छोटय़ा नगरांमधील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांच्या वाढत्या संख्येमुळे चित्रपट उद्योगालाही फायदा झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे.
 फिक्कीच्या माध्यम आणि मनोरंजन समितीचे अध्यक्ष उदय शंकर यांच्या मते २०१३ हे वर्ष मनोरंजन उद्योगासाठी आव्हान होते. मनोरंजन क्षेत्रात आणि विशेषत: टीव्हीसाठीच्या नियमावलींमध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले. या बदलांचे योग्य ते परिणाम दिसण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील. पण, सेटटॉप बॉक्स बंधनकारक केल्यामुळे हे वर्ष अधिक आव्हानात्मक होते. पण, त्यामुळे महसुलात चांगली वाढ झाली आहे.