बालनाट्यापासून सुरू झालेला प्रवासात सिनेमे आणि मालिका येत गेल्या पण त्यामुळे रंगभूमीचं वेड काही केल्या कमी झालं नाही. उलट तिथे जाता येत नाही म्हणून त्याचं रंगभूमीसाठीचं प्रेम उत्तरोत्तर वाढतच गेलं. अनेक मराठी सिनेमे, मालिका करूनही तिसऱ्या घंटेचा आवाज त्याला आजही साद घालतोय. आम्ही बोलतोय अभिनेते अशोक शिंदे यांच्याबद्दल. ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना त्यांनी रंगभूमीसाठीचं त्यांचं प्रेम व्यक्त केलं.
माझ्यासाठी नाटक म्हणजे माझा श्वास आहे. माझी आणि रंगभूमीची ओळख तशी बालनाट्यापासूनच झाली. माझ्यासोबत सतीश तारेही असायचा. बालपणी मोहन जोशी आणि इतर पुण्यातील ग्रुपसोबत अनेक बालनाट्यात काम केले. त्यानंतर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाही मी नाटकांत काम करत राहायचो. माझ्या बाबांना ते फारसं आवडायचं नाही, पण नाटकाची आवड मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळेच कॉलेज करता करता मी ‘नाथ हा माझा’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘मोरुची मावशी’ या नाटकांत काम केलं. नंतर ‘अपराध मीच केला’ या नाटकात स्मिता तळवकरांसोबत काम केलं यात मी खलनायक ‘शाम अजिंक्य’ची भूमिका साकारली होती.
यानंतर दिग्दर्शक प्रवीण कारळे यांनी मुंबईत ‘मास्टर प्लॅन’ या नाटकासाठी बोलावलं. पण या दरम्यान, चेहऱ्याला ओळख मिळत गेली आणि सिनेमे मिळायला लागले. या सगळ्या प्रवासात नाटक मागे राहिलं. यावर उपाय म्हणून मी तेव्हा पासूनच गणपतीच्या ११ दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अकलुज, गडचिरोली, गोंदिया यासारखा भागात नाटकांचे प्रयोग करतो. गेली २४ वर्ष माझा नित्यक्रम मोडलेला नाही. १३२ सिनेमे आणि १०० हून जास्त मालिका केल्यानंतरही त्या रंगभूमीची ओढ अजूनही स्वस्थ बसू देत नाही. आजही मला जर चांगले नाटक करायला मिळाले तर मी मागचा पुढचा विचार न करता त्यासाठी तयार होईन.
पण, सध्या मालिका करत असल्यामुळे आणि सिनिअर असल्यामुळे अर्थात ‘पर डे’ जास्त असतो. त्यामुळे एका दिवसात जास्तीत जास्त काम कसं करून घेता येईल हे पाहिलं जात. यात काही चूक आहे असं मला मुळीच वाटत नाही, शेवटी हा सगळा व्यवसाय आहे. त्यामुळे नाटक हातात घेतलं की त्याच्या तालमी, दौरे यांच्यासाठी वेळ द्यावा लागतो जे मालिका करताना तारेवरची कसरतच होते. पण मी कोणतीही मालिका हाती घेताना त्या मालिकेच्या निर्मात्यांना याची पूर्व कल्पना देऊन ठेवतो. जर एखादे नाटक हाती आले आणि अर्ध्या दिवसाने नाटकाच्या तालमीसाठी जायचे झाले तर मी स्वतःहून अर्धाच पर डे घेतो. कारण नाटकाच्या झिंगसमोर मला बाकी सगळं खुजं वाटतं.
पाहा : .. हे आहेत ऑनस्क्रिन आई-वडिलांनाच डेट करणारे सेलिब्रिटी
बाळ धुरी यांच्या ‘अपराध मीच केला’ या नाटकात अविनाश खडशीकरांची भूमिका मला करायची होती. त्या नाटकातले संवाद मला आजही पाठ आहेत. नाटकाचं पाठांतर करण्यासाठी साधारणपणे २० दिवस तरी लागतात. मी ते नाटक पुणे- मुंबई प्रवासात एका दिवसात पाठ केलं होतं. माझ्यासारखाच त्या नाटकाच्या प्रयोगावेळी म्युझिक ऑपरेटरही नवीन होता. नाटक रंगत आलेलं असताना एका प्रसंगात मला गोळी लागून मी मरतो असं दाखवण्यात आलं होतं. गोळीचा आवाज सुटल्यानंतर मी कोसळून खाली पडतो. पण, प्रयोगावेळी तो आवाज काही आलाच नाही, त्यामुळे मी मेलोच नाही. शेवटी प्रसंगावधान राखून जवळच असलेल्या टेबलवर चाकू होता, तेव्हा संवादांमध्ये बदल करून मला चाकूने मारण्यात आलं असं दाखवण्यात आलं. पण, चाकूने वार करायला आणि त्या म्युझिक ऑपरेटरला गोळीचा आवाज मिळायला एकच वेळ झाली. त्याने त्यावेळी गोळीचा आवाज लावला, त्यामुळे संपूर्ण थिएटरमध्ये एकच हशा पिकला. मी मेलेलो असतानाही एका कोपऱ्यात जाऊन हसत होतो. हा प्रसंग मी आजही विसरू शकत नाही.
शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com