जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदूकोण मंगळवारी ७ जानेवारी रोजी रात्री विद्यापीठात पोहोचली होती. त्यामुळे अनेक भाजपासमर्थकांनी दीपिकाला लक्ष्य केले. दीपिकाच्या ‘छपाक’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही अनेकांनी केली. इतकचं नाही तर दीपिकाच्या ‘छपाक’ चित्रपटातील खलनायकाचे नाव बदलल्याच्या चर्चाही सोशल मिडियावर रंगल्या.

अॅसिड हल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये हल्लेखोराचे नाव मुद्दाम बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. एका मासिकाने लक्ष्मीवर हल्ला केलेल्या व्यक्तीचे नाव बदलण्यात आल्याचा दावा करणारे वृत्त प्रकाशित केले.

ट्विटरवर काय ट्रेंड झाले?

ट्विटरवर नदीम खान म्हणजेच ज्याने खरोखर लक्ष्मीवर हल्ला केला होता त्याचे नाव ट्रेंड झाले. तसेच दीपिकाच्या चित्रपटात हल्ला करणाऱ्याचे नाव राजेश ठेवल्याचा आरोप करण्यात आल्याने ‘राजेश’ हे नावही टॉप ट्रेण्डींगमध्ये होते.

काय आरोप करण्यात आले?

ट्विटरवर राजेश आणि नदीम खान या नावाने हजारो ट्विट करण्यात आले. अनेकांनी लक्ष्मीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव बदलण्यात आले असल्याचे म्हटले. त्याचे खरे नाव नदीम खान असून चित्रपटात राजेश करण्यात आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या.

काय आहे सत्य?

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ चित्रपटात नदीम खान अशा कोणत्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. चित्रपटात मालतीच्या बॉयफ्रेंडचे नाव राजेश आहे. तसेच मालतीवर अॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव बशीर खान उर्फ बाबू असल्याचे दाखवण्यात आलं आहे. म्हणजेच ज्या पद्धतीने सोशल नेटवर्किंगवर हल्लेखोराचे नाव बदल्याचा दावा केला आहे तो चुकीचा आहे.

चित्रपटात काय दाखवण्यात आले आहे?

हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याने नावे बदलण्यात आली असली तरी त्यामध्ये हल्लेखोराला अगदी वेगळे नाव देण्यात आलेले नाही. म्हणूनच सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी चित्रपटात अॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव बदल्याचा दावा फोल ठरतो. दीपिकाने जेएनयूमध्ये जाऊन पाठिंबा दर्शवल्याने खवळलेल्या जेएनयूविरोधकांनी केवळ अफवा म्हणून चित्रपाटाशी संबंधित माहितीमध्ये मोडतोड करुन ती पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.